संकटकाळात मदत करणाऱ्या मित्राचा मित्रानेच घात केला; गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने हत्येचा उलगडा केला
Mumbai Crime : मुंबईच्या नालासोपारा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची किरकोळ कारणावरून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे.
नालासोपारा : मुंबईच्या (Mumbai Crime) नालासोपारा मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात मित्रानेच मित्राची किरकोळ कारणावरून हत्या (Murder) केल्याची घटना उजेडात आली आहे. एकाच गावात राहणाऱ्या, अडचणीच्या काळात एकमेकांना कायम मदत करणाऱ्या, नालासोपारातील एका मित्रानेच आपल्या जवळच्या मित्राचा घात केला आहे. यात एका मित्राला आर्थिक अडचण असल्याने घटनेतील दुसऱ्या मित्रानेत्याला मदत केली. मात्र, अवघ्या 26 हजारांसाठी त्याच मित्राने त्याची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 3 ने ही घटना उघडकीस आणली आहे. मात्र घटनेचे कोणतेही धागेदोरे नसताना, गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणून आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.
मदत करणाऱ्या मित्राचाच मित्राने केला घात
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील श्रीरामनगर येथे चाळीत राहणारा बांधकाम ठेकेदार मयत प्रमोदकुमार बिंद याचा एकाच गावात राहणारा गावचा मित्र आणि संशयित आरोपी समिरकुमार उर्फ समशेर बिंद हा गावावरुन नोकरीसाठी आला होता. मुंबईला येण्यासाठी संशयित आरोपीने आपली मोटरसायकल उत्तरप्रदेश येथील वाराणसी येथे 25 हजाराला गहाण ठेवली होती. मात्र, जुगाराची सवय असल्याने संशयित आरोपी समशेर बिंद हा सर्व पैसे जुगारात हरला. पैसे हरल्यामुळे आता गावी कसं जायचं? गाडी कशी सोडवायची? या विवंचनेत संशयित आरोपी समशेर बिंद होता. दरम्यान, त्याचवेळी त्याचा गावातील मित्र मयत प्रमोदकुमार बिंद याने त्याला आपल्या घरी आसरा दिला आणि नोकरीला लावण्याच आश्वासन दिलं.
हत्या केल्यानंतर घरातील रक्कमही केली लंपास
दरम्यान, 23 ऑगस्ट 2024 रोजी मयत प्रमोदकुमारने संशयित आरोपी समेशरला आपल्या घरी आसरा दिला. त्याला जेवायलाही दिलं. मात्र त्यानंतर घरीच झोपायला सांगून, उद्या सकाळी तुला कामावर घेवून जावून नोकरी लावतो, असं आश्वासन ही दिलं. मात्र, रात्रीच संशयित आरोपी समशेरची नियत खराब झाली. आणि आपली मदत करणा-या मित्राच्याच गळ्यावर चाकू चालवून त्याची हत्या केली. तसेच घरातील 26 हजार रोख रक्कम घेवूनही फरार झाला. 24 ऑगस्टला सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर गुन्हे शाखा 3 च्या युनिटने कोणतेही धागेदोरे नसताना, तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीला ट्रेस करुन त्याला उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून अटक करण्यात यश मिळवलं आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहीता 103(1) प्रमाणे गुन्हा नोंद करुन, पुढील तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा