Beed : बीड नगरपालिका निवडणुकीच्यापूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का, आमदार संदीप क्षीरसागरांचे शिलेदार शिवसेनेत करणार प्रवेश
Beed : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
Beed : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे समर्थक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांना साथ देणारे अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा हे पाच जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.सोमवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. अमर नाईकवाडे यांनी जय महाराष्ट्र, 28 मार्च असे सोशल मीडियावर लिहित शिवबंधन बांधण्याचे संकेत दिले आहेत.
बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर सेवकांच्या गटाचे प्रमुख आरोप पटेल तसेच आक्रमक विरोधक म्हणून ज्यांची बीड नगरपालिकेमध्ये ओळख आहे, असे अमर नाईकवाडे यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरे हे संदीप क्षीरसागर यांना सोडचिठ्ठी देऊन जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
नितीन लोढा हे शिवसंग्रामचे असून चौसाळा गटातून आ. क्षीरसागर यांना मतांची आघाडी देण्यात ते यशस्वी झाले होते. तसेच बीडमध्ये पटेल, लोढा, नाईकवाडे व घुमरे यांनी दिवसरात्र एक करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु आगामी नगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने हे सर्व आता शिवसेनेत दाखल होणार आहेत. त्यामुळे पालिकेत काकांची पकड मजबूत बनू पाहात आहे. पुतण्या आ. क्षीरसागर यांना यासाठी प्लॅन तयार करावा लागणार आहे.
बीड नगरपालिकेतील विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये कायम बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. अगदी प्रत्येक वेळी बैठकीमध्ये बीडचे भूषण म्हणून भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर टीकेचे बाण सोडणारे अमर नाईकवाडे आता मात्र भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी शिवबंधन हाती बांधणार आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टक्केवारी घेत असल्याचा अमर नाईकवाडे यांचा आरोप आहे.
बीड नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो असा आरोप करणारे अमर नाईकवाडे आता मात्र बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरच वेगवेगळ्या कामात टक्केवारी घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संबंधित बातम्या
Beed: मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले, बीड येथील धक्कादायक घटना
बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण
Beed : पांढऱ्या दुधाचा काळा धंदा करणाऱ्यावर बीड पोलिसांचा छापा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha