एक्स्प्लोर
परभणी महापालिकेत आघाडीत बिघाडी, काँग्रेसने राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडले
परभणी महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. त्यातच काँग्रेसनेच राष्ट्रवादीचे सात नगरसेवक फोडून सहलीवर पाठवले आहेत.
परभणी : एकीकडे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून महाशिवआघाडी करत असताना परभणीत मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेत सत्ता यावी यासाठी इथे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असून काँग्रेसनेच राष्ट्रवादीचे सात नगरसेवक फोडून सहलीवर पाठवले आहेत. परभणी महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे तर राष्ट्रवादी विरोधी बाकावर आहे. त्यातच राष्ट्रवादीमधील विजय जामकर यांच्या 13 नगरसेवकांच्या गटाने कायम स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे, ती आता महापौर, उपमहापौर निवडणुकी दरम्यानही कायम आहे.
22 नोव्हेंबर रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून महापौरपदासाठी अनिता रवी सोनकांबळे तर उपमहापौरपदासाठी भगवान वाघमारे यांचे अर्ज एकमताने दाखल करण्यात आले. मात्र राष्ट्रवादीच्या विजय जामकर गटानेही इथे महापौरपदासाठी डॉ. वर्षा खिल्लारे आणि गवळण रोडे यांची उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांचे नगरसेवक फोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांचे 25 आणि राष्ट्रवादीच्या बाबाजानी गटाच्या सात नगरसेवकांना सहलीवर पाठवलं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विजय जामकर गटाने शिवसेना-भाजपचे 13 नगरसेवक आणि अपक्ष मिळून संख्याबळ गाठण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे आता महापौर नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. राज्यात एकत्रित असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीत परभणीत मात्र एकमेकांच्या विरोधात गेल्याने याबाबत दोन्ही पक्ष आता काय भूमिका घेणार यावर महापौर, उपमहापौरपदाचं गणित अवलंबून आहे.
परभणी महानगरपालिकेतील संख्याबळ एकूण ६५
काँग्रेस - 30
राष्ट्रवादी काँग्रेस - 20
भाजप - 8
शिवसेना- 4
अपक्ष- 2
एमआयएम- 1
महापौरपदासाठी लागणारी मॅजिक फिगर 33
* काँग्रेसने अशी केलीय जुळवाजुळव : काँग्रेसचे 30+अपक्ष 1+राष्ट्रवादी बाबाजानी गटाचे 7 असे एकूण 38 नगरसेवक
* राष्ट्रवादीतील जामकर गटाची जुळवाजुळव : राष्ट्रवादीतील विजय जामकर गट 13+शिवसेना 4+भाजप 8+ अपक्ष 1+ एमआयएम 1 असे एकूण 27 नगरसेवक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
बीड
Advertisement