Ganeshotsav 2022 : राज्यातील प्रथम तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना 5 लाखांचे पुरस्कार, 2 सप्टेंबरपर्यंत 'येथे' करा अर्ज
राज्यातील पहिल्या तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार 5 लाख रुपये, व्दितीय पुरस्कार 2 लाख 50 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 1 लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
नागपूर : गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) मंडळाच्यावतीने पर्यावरण, सामाजिक सलोखा यासारख्या विविध विषयावर आधारित देखावा व सजावट करणाऱ्या उत्कृष्ट मंडळांना राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी उत्कृष्ट सजावटी करणाऱ्या गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर 2 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. राज्यातील पहिल्या तीन उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम पुरस्कार 5 लाख रुपये, व्दितीय पुरस्कार 2 लाख 50 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 1 लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर (District Level Awards) देखील पुरस्कार दिले जाणार आहे.
'या' उपक्रमांचे आयोजन
यासाठी गणेश मंडळांनी पर्यावरण पुरक (Eco Friendly Decoration) सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, पाणी बचत, अंधश्रध्दा निर्मुलण सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन विषयावर देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीतील देखावा, रक्तदान शिबिर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्यासाठी शैक्षणिक, आरोग्य व सामाजिक आदी बाबत केलेले कार्य, पारंपारीक व सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural Event), पारंपारिक खेळाच्या स्पर्धा आदी बाबत देखावे व कार्यक्रमाचे आयोजन केलेले असावे.
अर्जाचा नमूना 'या' संकेतस्थळावर उपलब्ध
स्पर्धेतील उत्कृष्ट मंडळाची जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती मार्फत निवड करण्यात येणार आहे. सदर समितीमध्ये शासकीय व शासनमान्य कला महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी सदस्य म्हणून असणार आहे. अर्जाचा नमुना राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या www.pldeshandekalaacademy.org व दर्शनिका विभागाच्या https://mahagazetteers.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्य आकारण्यात येणार नाही, असे शासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या