(Source: Poll of Polls)
किल्ले रायगडावर उत्खननात सापडली ३५० वर्षांपुर्वींची 'सोन्याची बांगडी'; राज्याच्या इतिहासात प्रथमतःच आढळला स्त्रियांचा पहिला अलंकार
किल्ले रायगडावरील इतिहासाला सोन्याची झळाळी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची साक्ष देणारा ठेवा सर्वांसमोर...
रायगड : किल्ले रायगडावर सुरु असलेल्या उत्खनन कामात शुक्रवारी अनमोल असा ठेवा सापडला असून, सुमारे ३५० वर्षांपूर्वीची सुमारे अडीच तोळे वजनाची नक्षीदार सोन्याची बांगडी आढळल्याने इतिहासाला नवा उजाळा मिळाला आहे. तर, रायगडावर सुरू असलेल्या उत्खन्नाच्या या कामामध्ये छोटी निरांजनं देखील सापडली आहे.
किल्ले रायगडाच्या विकासासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरण समितीमार्फत किल्ल्यावरील सुमारे साडेतीनशे ठिकाणांचे उत्खन करण्यात येणार आहे. यामध्ये, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात येत असून, यामध्ये गेल्या काही वर्षात शिवकालीन शस्त्रांचे अवशेष, नाणी आणि काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू आणि वास्तुंचे अवशेष आढळून आले आहेत.
दरम्यान, किल्ले रायगड येथे जगदीश्वर मंदीराशेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये सोन्याची नक्षीदार बांगडी सापडल्याने इतिहासाचा मोठा खजिना सापडला आहे. यामुळे, गेल्या चार वर्षात प्रथमतःच महाराष्ट्राच्या इतिहासात साबुत स्थितीत सापडलेला स्त्रियांचा हा पहिला अलंकार आहे. किल्ले रायगडावर सापडलेल्या या सोन्याच्या बांगडीवर नक्षीकाम करण्यात आले असून, यामुळे सुमारे 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची साक्ष देणारा खजिना सापडला आहे.
मागील गेल्या दोन महिन्यांपूर्वी कानातल्या रिंगादेखील आढळून आले आहे. त्यातच, ज्या वाड्यात ही सोन्याची बांगडी सापडली आहे त्याठिकाणी मोठा सरदार राहत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे, संशोधन करण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. तर, छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून किल्ल्यावर आढळलेली सोन्याची बांगडी ही फार मोठा शोध असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.
रायगडावर आढळलेल्या या अनमोल खजिन्यामुळे भविष्यात अनेक ऐतिहासिक खजिना समोर येण्याची शक्यता असून वाड्याच्या या परिसरात सोन्याचे होण देखील सापडण्याचा विश्वास संभाजी राजे यांनी व्यक्त केला आहे. तर, पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या गतीने किल्ले रायगडावरील ३५० ठिकाणचे उत्खनन होण्यासाठी खुप वेळ लागणार आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाच्या स्पेशल सेलला उत्खननाची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. यापूर्वी, किल्ले रायगडावरील उत्खन्नात शिवकालीन सोन्याचं नाणं , बंदुकीची गोळी, तोफेचे अवशेष, नक्षीदार मातीची मटकी, चीनीमातीच्या भांडीची तुकडे, विटा आणि कौलै, तोफगोळे अशा ऐतिहासिक वस्तू आढळून आल्या आहेत