21 February Headlines : सत्ता संघर्षाची सुनावणी, बारावी परीक्षा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; आज दिवसभरात
21 February Headlines : आजपासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. तर, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
21 February Headlines : आजपासून महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तर, त्याच वेळी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने परीक्षा घेणे हे मोठे आव्हानात्मक काम असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होणार आहे. तर, निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेची आज बैठक होणार आहे.
आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात
आजपासून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील. सकाळी सत्रातील परीक्षा अकरा वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी म्हणजे साडेदहा वाजता हजर राहायचं आहे तर दुपारची सत्रातील परीक्षा तीन वाजता सुरू होणार असून विद्यार्थ्यांनी अडीच वाजता परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील शिक्षेकतर कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचा परिणाम बारावीच्या परीक्षेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दिल्ली
- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.
- निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे.
मुंबई
- राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
- आजपासून पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे.
पुणे
- कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची सभा होणार आहे. तर, कॉंग्रेसचे कसब्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारेंची सभा होणार आहे.
- चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे.
कोल्हापूर
- देशातील पहिले गाढवांचे प्रदर्शन कोल्हापुरात भरले जाणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून कण्हेरीमठ इथे होत असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव याठिकाणी हे अनोखे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
सांगली
- संभाजी भिडे यांच्या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या दुसरा वर्धापन दिन कार्यक्रमासाठी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि समीर वानखेडे सांगलीत उपस्थित राहणार आहेत.