20 January In History : आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण, 'सरहद गांधी' यांचा मृत्यू, इतिहासात आज
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्याच दिवशी झाला होता. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आली होती. सरहद गांधी आणि बादशाह खान या नावाने प्रसिद्ध खान अब्दुल गफार खान यांचं आजच्या दिवशी 1988 साली निधन झालं होतं. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्याच दिवशी झाला होता. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1871 : सर रतनजी जमशेदजी टाटा यांचा जन्म
सर रतनजी टाटा यांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. ते भारतातील प्रसिद्ध पारशी उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे पुत्र होते. भारतातील टाटा समूहाच्या वाढीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 20 जानेवारी 1871 रोजी मुंबईत जन्म झाला. टाटा अँड कंपनीसह इंडियन हॉस्टेल्स कंपनी लिमिटेड, टाटा लिमिटेड, लंडन टाटा आयर्न अँड स्टील वर्क्स सकची, द टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड इंडियाचे ते संचालक होते. त्यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1918 रोजी झाला
1898 : 'मास्टर कृष्णराव' यांचा जन्म
1898 : कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा 'मास्टर कृष्णराव' यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार अशी त्यांची ओळख. त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून यायचा. 'वंदे मातरम' या गीताला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. त्यांचा मृत्यू 20 आक्टोबर 1974 रोजी झाला.
1957 : आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण
आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करण्यात आली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, ट्रॉम्बे (बॉम्बे) येथे उभारलेल्या अप्सरा या देशातील पहिल्या अणुभट्टीचे उद्घाटन केले. अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ज्या संस्थेचं सध्याचं नाव भाभा अणुसंशोधन केंद्र असं आहे. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती . या विचारातूनच त्यांनी अणुउर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ.होमी भाभा यांची नेमणूक केली.
1988: खान अब्दुल गफार खान तथा 'सरहद गांधी' यांचा मृत्यू
सरहद्द गांधी आणि बादशाह खान या नावाने प्रसिद्ध खान अब्दुल गफार खान यांचं आजच्या दिवशी 1988 साली निधन झालं होतं. ते वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलनासाठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे समर्थक होते. ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गांधी’ या नावाने संबोधले जायचे.
1999: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर (Girish Karnad)
प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांवा 1998 साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे. 'ययाती' हे गिरीश कर्नाड यांचे पहिले नाटक. निशांत, मंथन, इक्बाल, डोर, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांमधूनही कर्नाड यांनी महत्त्तवाच्या भूमिका साकारल्या. जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी भूमिका साकारली होती.
2005 : परवीन बाबी यांचं निधन (Parveen Babi)
परवीन बाबी यांचं आजच्या दिवशी निधन झालेलं. 4 एप्रिल 1954 साली त्यांचा जन्म झालेला. आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी यांनी अमर अकबर ॲन्थनी, दीवार, नमक हलाल, शान यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका निभावली होती. आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना 1983 साली परवीन बाबीने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला. 90 च्या दशकात त्या एकट्या पडत गेल्या. 2005 साली घरीच त्यांचा मृतदेह आढळून आला.
2008 : पहिल्यांदाच एखाद्या सिनेमॅटोग्राफरला दादासाहेब फाळके पुरस्कार
पहिल्यांदाच एखाद्या सिनेमॅटोग्राफरला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये पडद्यामागून महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांमध्ये सिनेमॅटोग्राफरचा समावेश असतो. 1969 साली दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना करण्यात आली. चित्रपट जगतातील महान सिनेमॅटोग्राफर व्ही के मूर्ती यांना 2008 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. एखाद्या सिनेमॅटोग्राफरला चित्रपट जगतातील हा सर्वोच्च सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ होती. 'चौदहवी का चांद', 'कागज के फूल' आणि 'साहब बीवी और गुलाम'यासारख्या अनेक सिनेमांचं सिनेमॅटोग्राफर व्ही.के. मूर्ती यांनी काम केलं होतं.
2009: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी
अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी आजच्या दिवशी झाला होता. अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी पदभार स्वीकारला. वॉशिंग्टन, डीसी येथे 1 दशलक्षाहून अधिक लोक बराक ओबामा यांच्या शपथविधीला उपस्थित होते.
इतर महत्वाच्या घडामोडी अन् घटना
1817: कोलकात्यामध्ये हिंदू कॉलेजची स्थापना. आता हे कॉलेज प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणून ओळखले जाते.
1861 : मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबरीकार, निबंधकार आणि समाजसुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म
1930 : चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
1948: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी 1934, 1944 मध्ये दोनदा त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते.
1960 : आपा शेर्पा यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला. नेपाळी गिर्यारोहक असलेल्या आपा शेर्पा यांनी 19 वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे.
1972: अरुणाचल प्रदेश आधी पूर्वी नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी होतं. त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तर आणि मेघालयला राज्याचा दर्जा देण्यात आला.
1998 : 'पोलार संगीत पुरस्कार' हा संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणाराविख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
2002 : रामेश्वरनाथ काओ यांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला. रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.