(Source: ECI/ABP News/ABP Majha)
17th June 2022 Important Events : 17 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
17th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
17th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 17 जून चे दिनविशेष.
17 जून या दिवशी इतिहासात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना,
1632 : मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज हिचे निधन
मुघल बादशाह शहाजहान याची पत्नी मुमताज महल हिचे आजच्या दिवशी निधन झालं. तिच्या स्मरणार्थ शहाजहान याने आग्रा येथे ताजमहलची निर्मिती केली.
1756 : नवाब सिराजुद्दौलाने 50 हजार सैनिकांच्या मदतीने कोलकात्यावर हल्ला केला.
1799 : नेपोलियन बोनापार्टने इटली जिंकली आणि त्याचा आपल्या साम्राज्यात समावेश केला.
1839 : लॉर्ड विल्यम बेंटिकचे निधन
लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारतातील कारकीर्द 1828 - 1835 अशी होती. त्याने भारतात अनेक पुरोगामी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. बेंटिक यांने 1829 चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला. प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला. बेंटिकने लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा 1835 चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत संमत केला.
निर्दोष आणि दुर्बल लोकांना लुटणाऱ्या डाकूंचा व हत्यारांचा समूह 'ठगांचा' बंदोबस्त केला. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले. बालहत्त्या आणि नरबळीवर बंदी आणली. लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला. 1835 मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली.
1917 : महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे साबरमती आश्रमातील हृदय कुंज या टिकाणी रहायला गेले.
1933 : सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यात आली
सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने 14 फेब्रुवारी 1930 रोजी झाली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, 50 टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, 50 टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या.
सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली आणि 12 मार्च 1930 रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. 5 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मिठाचा कायदा मोडला.
गांधी-आयर्विन करारानंतर ही चळवळ मागे घेण्यात आली.
1938 : जपानने चीनच्या विरोधात युद्ध पुकारलं
एकीकडे जर्मनी, इटली आणि स्पेनने आक्रमक धोरण स्वीकारत युरोपमध्ये शेजारील राष्ट्रांवर हल्ल्याची तयारी सुरू केली असताना आशियामध्येही त्याचे लोण पसरले. वसाहतवादी धोरण स्वीकारणाऱ्या जपानने चीनच्या विरोधात युद्ध पुकारले.
1944 : जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात हार मानली
जर्मनीच्या आक्रमक धोरणामुळे 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. या युद्धात सगळं जग भरडून निघालं. शेवटी दोस्त राष्ट्रांच्या समोर जर्मनीने माघार घेतली.
1970 : शिकागोत पहिल्यांदाच किडनी ट्रान्सप्लॅन्टची शस्त्रक्रिया करण्यात आली
1991 : भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हा राजीव गांधी यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
2004 : मंगळावर पृथ्वीप्रमाणेच दगड सापडले.
2008 : 'तेजस' विमानाची पहिल्यांदाच यशस्वी चाचणी करण्यात आली.