Pune Sextortion : पुण्यात 10 महिन्यात 1400 लोक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; तुम्हीही अडकलात तर काय कराल?
पुणे शहरात 2022 मध्ये सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्यांची संख्या तब्बल 1,400 हून अधिक आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
Pune Sextortion : पुणे (Pune) शहरात 2022 मध्ये सेक्सटॉर्शनच्या (sextortion) जाळ्यात अडकलेल्यांची संख्या तब्बल 1,400 हून अधिक आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात दोघांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सेक्सटॉर्शनबाबत चर्चा वाढू लागली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1400 हून अधिक लोकांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र सेक्सटॉर्शनच्या सापळ्यात अडकलेल्यांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांमागे सोशल मीडियाचा वाढता वापर कारणीभूत आहे. पुण्यातील दत्तवाडी येथील 19 वर्षीय विद्यार्थ्याला ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी ब्लॅकमेल करून त्याचे नग्न फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली. त्याने धमक्यांना बळी पडून त्यांना 4,500 रुपये दिले, परंतु शेवटी 28 सप्टेंबर रोजी तो दबाव सहन करू शकला नसल्याने त्याने आपले जीवन संपवलं. शहरातील धनकवडी भागातील 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही सायबर गुन्हेगारांकडून छळ आणि ब्लॅकमेल केल्यानंतर आत्महत्या केली.
जानेवारी 2022 पासून, पुण्यात एकूण 1,445 प्रकरणांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये पीडितांनी सायबर गुन्हेगारांकडून लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारी केल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले गेले आहेत आणि तपास सुरू आहे, सायबर पोलिसांनी सांगितलं आहे. यात तरुणच नाही तर वयस्क नागरिक देखील अडकल्याच्या तक्रारी आहेत, अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पीडित सामान्यत: अॅपवर डीपी म्हणून ठेवलेल्या महिलेच्या फोटोला बळी पडतात आणि संभाषण सुरू करतात. काही माहिती शेअर केल्यानंतर आणि पुरुष पीडितेशी मैत्री केल्यानंतर, महिला व्हिडिओ कॉल करते. हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करते. त्यानंतर काही दिवसांनी पीडितांकडे पैसे मागण्यास सुरुवात करते. पैसे देण्यास नकार दिल्यास फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देते. यात सगळ्या वयोगटातील पुरुष अडकले जातात. धमकी आणि बदनामीला घाबरुन टोकाचं पाऊल उचलतात. मात्र या सगळ्यांना घाबरण्याची गरज नाही यावर उपाय आहेत. तुम्ही पोलिसांशी किंवा जवळच्या लोकांशी बोलू शकता त्यावर तुम्हाला नक्की मदत मिळेल, असं सायबर एक्सपर्ट सांगतात.
आपणास धमकी दिली गेल्यास
-घाबरू नका, शांत रहा, चॅट थांबवा आणि लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
-नाही म्हणण्यास घाबरू नका आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
-आपणांस कोणी धमकावल्यास किंवा त्रास दिल्यास पालकांना लगेचच त्याबद्दल सांगा.
-आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे धमकवणाऱ्याला सांगा
-कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
-लगेच लॉगऑफ करू नका, कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा.
संबंधित बातम्या-