शाबास मुंबईकर! मुंबईत दिवाळीत गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण
मुंबईकरांनी या दिवाळीला कोरोनाच्या काळात सकारात्मक चित्र दाखवलं असून ध्वनी प्रदूषणाच्या रिपोर्टमधून ते सिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी फटाके वाजतच नव्हते त्यामुळे नोंद घेणं सुद्धा कठीण होतं.
मुंबई : दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. मात्र दिवाळीत फुटणारे फटाके यामुळे वायू प्रदूषन, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. मात्र यंदा मुंबईकरांचं यासाठी कौतुक केलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण यंदा झालं आहे. मुंबईकरांनी फटाके न फोडण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे शक्य झालं आहे.
मात्र, सायलेंट झोन असलेल्या शिवाजी पार्कातच फटाके वाजवून नियमांचे उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. 2003 पासूनचा लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणजेच खऱ्या अर्थाने दिवाळीच्या दिवशी सर्वात कमी ध्वनी प्रदूषणाची नोंद आवाज फाऊंडेशन कडून करण्यात आली आहे. मागील वर्षी मरिन ड्राईव्ह परिवारात सर्वाधिक 112 डेसीबलची नोंद झाली होती. तर यवर्षी सर्वाधिक 105.5 डेसीबलची सर्वाधिक नोंद झाली आहे. ज्या ठिकणी 105.5 डेसीबलची नोंद झाली आहे तो सायलेंट झोन असलेला शिवाजी पार्कचा भाग आहे. रात्री 10 नंतर या ठिकाणी फटाके वाजवण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
मुंबईकरांनी या दिवाळीला कोरोनाच्या काळात सकारात्मक चित्र दाखवलं असून ध्वनी प्रदूषणाच्या रिपोर्टमधून ते सिद्ध होत आहे. अनेक ठिकाणी फटाके वाजतच नव्हते त्यामुळे नोंद घेणं सुद्धा कठीण होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाके न फोडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मुंबईकरांनी इको फ्रेंडली दिवाळी साजरी केली. जो लढा पर्यावरणवादी लढत होते त्याला यश मिळतंय आणि भविष्यात सुद्धा मिळेल असं सध्याच चित्र आहे
दिवाळीत मुंबईतील हवेची गुणवत्ता सर्वसाधारण, सफर संस्थेचा रिपोर्ट
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फटाके बंदीचा निर्णय आणि त्यासोबतच कमीत कमी फटाके वाजवून प्रदूषण कमी व्हावे यासाठी केलेल्या प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांनी सकारात्मक प्रतिसाद दाखवल्याचं चित्र आहे. मुंबईच्या वायू प्रदूषणबाबत सफर संस्थेकडून आलेल्या आकडेवारीमध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही सर्वसाधारण राहिली असून यावर्षी (AQI) एअर क्वालिटी इंडेक्स हा 200 पेक्षा कमी राहिल्याचे चित्र आहे. दिल्ली, पुणे, अहमदाबाद या मोठ्या शहरांपेक्षा मुंबईतील वायू प्रदूषण हे दिवाळीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी कमी असल्याचे आकडेवारीमध्ये समोर आला. 2018 साली व त्याआधीच्या वर्षांमध्ये मुंबईचा AQI हा 200 पेक्षा अधिक असायचा. मात्र मागील वर्ष व यावर्षी हा AQI सर्वसाधारण असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एक सकारात्मक चित्र या निमित्याने समोर उभं राहत आहे. चेंबूर, माझगाव मालाडमध्ये सर्वधिक वायू प्रदूषणाची नोंद झाली. 2016-18 पेक्षा यंदा फटाक्यांचे उत्सर्जन हे 50 टक्क्यांपेक्षा कमी झालं आहे.