Lonar Sarovar: लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात; अवजड वाहतूकीमुळे कडांना मोठे धक्के, नेमकं काय घडतंय?
Lonar Sarovar: लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यातआल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Lonar Sarovar बुलढाणा: बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील लोणार सरोवर (Lonar Sarovar) हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. मात्र या लोणार सरोवराच्या काठावरून जाणारे दोन महामार्गांवरून होणारी अवजड वाहतूक यामुळे लोणार सरोवराच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. लोणार सरोवराच्या काठावरून पूर्वेच्या दिशेने शेगाव पंढरपूर महामार्ग तर उत्तरेकडून वाशिम जालना महामार्ग जातो. या दोन्ही महामार्गावरून नियमित अवजड वाहतूक सुरू असल्याने या अवजड वाहतुकीमुळे व कंपनामुळे लोणार सरोवराच्या काठांना कंपने बसतात व त्यामुळे मोठे भूसखलन झाल्याचं समोर आलं आहे आणि यामुळे मात्र लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
दोन राष्ट्रीय महामार्गावरून सततच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे लोणार सरोवर काय परिणाम होतोय?
- महामार्गावरून जाणाऱ्या सततच्या अवजड वाहनांमुळे कंपने निर्माण होतात व त्यामुळे माती भुसभुशीत होऊन भूस्खलन होत आहे.
- लोणार सरोवराच्या काठावर सतत होत असलेल्या वृक्षतोडीमुळे मातीची झीज होऊन भूस्खलन होत आहे.
- लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या महामार्गांचे सतत विकास कामे होत असतात आणि त्यामुळे माती भुसभुशीत होऊन भूस्खलन होत आहे.
- सतत भुसखलन झाला तर लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात येईल.
महामार्गांना वळण रस्ता करावा-
अलीकडेच जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गांमुळे लोणार अभयारण्यातील वन्य प्राण्यांनाही नुकसान होत आहे. तर दुसरीकडे या महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे व त्या वाहनांच्या कंपनामुळे लोणार सरोवराच्या कडा ढासळत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे तात्काळ सरकारने लोणार सरोवराच्या काठावरून जाणाऱ्या महामार्गांना वळण रस्ता करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
लोणार सरोवराविषयी माहिती-
लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील 15 मंदिरे विवरातच आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.