शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल
लातूर जिल्ह्यातील शेतकरी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील हा संवाद आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे
लातूर : शेतकरी आणि महावितरण यांचा सातत्याने संबंध येत असतो, कारण शेतीसाठी वीज हा अनिवार्य घटक बनला आहे. त्यामुळे, वीजेच्या अडचणीसंदर्भाने शेतकरी महावितरण कार्यालयात खेटे मारतात, अनेकदा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन दिलं जातं. पण, प्रत्यक्ष काम केलं जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटून ते अरेरावी किंवा मारहाण करतात. तर, कधी शेतकरी देखील आपल्या कामासाठी अडून बसतात आणि वाद घालतात. आता, लातूर (Latur) जिल्ह्यातील हाडोळती येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण केल्याची घटना घडली आहे. आजच्या तारखेत शेतातलं काम कर, अन्यथा मार खाशील असं म्हणत शेतकऱ्यांना (Farmer) मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतकरी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील हा संवाद आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मारहाण करणाऱ्या विरोधात अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील महावितरणच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटीझन्स आपल्या आपल्या परीने त्यावर कमेंट करत आहेत. अमोल सूर्यवंशी हे महावितरणच्या हाडोळती कार्यालयात कनिष्ठ अभियंता आहेत. काल त्यांच्या कार्यालयात हिप्पळगाव येथील कृष्णा जाधव नावाचा शेतकरी दाखल झाला. मागील काही दिवसांपासून माझ्या शेतातील पोरीचं काम रखडलं आहे. ते तात्काळ करून देण्यात यावं यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. शाब्दिक स्वरूपात सुरू असलेला वाद काही वेळातच हातघाईवर गेल्याचा पाहायला मिळत आहे.
कृष्णा जाधव यांनी कनिष्ठ अभियंता सूर्यवंशी यांना चापट मारत काम नाही केले तर अजून मारण्याची धमकी दिली. कार्यालयात उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण थोडक्यात मिटवले. मात्र, ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यामुळे, या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अहमदपूर पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा महावितरणचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा अभाव किंवा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दफ्तर दिरंगाईचा मुद्दा समोर आला आहे.
हेही वाचा
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार; 3 शहरांमधील स्मशानभूमीमध्ये चाचपणी सुरू