(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur News: बळीराजाला अजूनही कृपा'वृष्टी'ची प्रतीक्षा! पावसाची उघडीप आणि वाऱ्याचा मारा शेतकऱ्यांची चिंता वाढली
Latur News: मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा चिंता लागून राहिली आहे.
Latur News: लातूर जिल्ह्यात काही भागात पाच ते सात दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस (Rain) खूपच कमी ठिकाणी झाला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ पावसाची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे मात्र अजूनही आभाळाकडे लागून राहिले आहेत. त्यात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लातूर (Latur) जिल्ह्यात 2016 साली निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने लातूरला चांगलीच साथ दिली होती. यंदा मात्र एक महिन्याहून अधिक काळ उलटला तरीही पावसाची अद्यापही कृपा लातूरवर झाली नसल्याचं चित्र आहे. पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्यामुळे मूग आणि उडीद पिकांच्या पेरण्या होऊ शकला नाहीत. शेतकऱ्यांची सगळी भिस्त सोयाबीनवर होती. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात पेरणी योग्य पाऊसच झाला नसल्यामुळे पेरणीला वेग आलाच नाही. सध्या जिल्ह्यात पन्नास टकक्यांपर्यंत पेरणी झाल्याचं चित्र आहे.
पेरणी केली मात्र दुबारचे संकट
लातूर जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र पाच लाख 99 हजार 455 हेक्टर्स इतके आहे. त्यापैकी दोन लाख 99 हजार 111 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.तर सध्या जिल्ह्यात एकूण 50 टक्केच पेरणी करण्यात आली आहे. तर सर्वाधिक पेरणी ही सोयाबिन पिकाची आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक भागात पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी घाईतच पेरणी केली. पण आता पाच दिवसांपेक्षा अधिक काळ झाला तरीही कृपावृष्टी झाली नाही. त्यामुळे पेरणी केल्यानंतर आता पिकं उगवेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
जिल्ह्यातील अनेक भाग कोरडेच
जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही पावसाची कोणतीही चिन्ह दिसत नसल्याचं चित्र आहे. हलक्या सरींचा पाऊस बरसला असला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे काही ठिकाणी अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अजूनही चिंताग्रस्त आहेत.
जिल्ह्यातील ज्या भागात सुपीक जमिनी आहेत, अशाच ठिकाणी पेरणी झाल्याचं चित्र आहे. मात्र मागील तीन दिवसांपासून परिस्थिती आणखी गंभीर होत चालल्याचं चित्र सध्या आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नाही ते अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तर जमिनीत पेरणी योग्य ओलावा असेल तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा :