Latur Rain : दीड तासात 60 मिमी पाऊस... . महाराष्ट्र-कर्नाटकाला जोडणारा पर्यायी पूल गेला वाहून
Latur Rain : लातूर जिल्ह्यामध्ये आज तुफान पाऊस झाल्यामुळे अनेक गावांना जोडणारे अंतर्गत पूल वाहून गेले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचं दिसून आलं.
Maharashtra Rain Update : लातूरसह जिल्ह्याभरात आज पावसाची तुफान हजेरी लागल्याचं दिसून आलं. औराद शहाजानी परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस पडला असून दीड तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने तीन तासांसाठी वाहतूक बंद होती. अनेक गावांना जोडणाऱ्या छोट्या मोठ्या पुलावरूनही पाणी आल्याने तीन ते चार तास वाहतूक ठप्प होती.
लातूर जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळेला अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. लातूर, औसा, लामजना, किल्लारी, निलंगा या भागात पावसाने पंधरा ते वीस मिनिट जोरदार हजेरी लावली होती. मात्र निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी ,माने, जवळगा सारख्या भागात तुफान पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले आहे. दीड तासात तब्बल 60 मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे या भागातील चित्र अक्षरशः पालटून गेले होते.
लातूर- जहिराबाद महामार्गावरील शेजारील कर्नाटक हद्दीतील जामखंडी येथील पर्यायी पूल वाहून गेला. त्यासोबतच औराद शहाजनी परिसरातील तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी गावांतील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले झाले होते. औराद शहाजानी ,तगरखेडा, हालसी, सावरी, बोरसुरी या भागातील नागरिकांनी शेतकरी हे वाहतूक बंद असल्याने अडकून पडले होते.
कमी कालावधीत झालेल्या तुफान पावसामुळे पुलावरून पाणी जात होतं. पुलावरून पाणी जात असल्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली. तीन तास या भागात वाहतूक ठप्प होती. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या भागातील ओढ्यांना नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं होतं. तीन तासानंतर पाणी ओसरलं आणि वाहतूक सुरळीत झाली. शेतावरून संध्याकाळी घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांना पुलावरून पाणी गेल्यामुळे तब्बल तीन साडेतीन तास घरी जाता आलं नाही.
ही बातमी वाचा: