Latur News: तोतया न्यायाधीशाची लातूरमध्ये बनवेगिरी; हायकोर्टाचे न्यायाधीश असल्याचं सांगून पोलीस, आमदारांनाही बनवलं!
Latur News: आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर गावात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्याचं बिंग फुटलं.
लातूर : मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याचे भासवून गंडा घालणाऱ्या तोतया न्यायाधीशाला अटक करण्यात आली आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश असल्याचं सांगून पोलीस आमदारांनाही बनवलं. काही दिवसांनंतर पोलिसांना लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तोतया न्यायाधीश आता पोलीस कोठडीची हवा खात आहेत.
अमीरअली सय्यद असे तोतया न्यायाधीशाचे नाव आहे. लातूर शहरातील इंडिया नगरमधील आहे. त्याचं मूळ गाव शिवणखेड. त्याने एलएलबी केल्याचा दावा केला जातोय. त्यानंतर त्यांनी काही काळ लातूरमधील ज्येष्ठ वकिलाकडे ज्युनिअर शिपही केली. त्यानंतर दीड दोन वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला. त्यानंतर माझी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याचं सांगत तो अवतरला. काही दैनिकांत उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून पुरस्कार मिळाल्याच्या बातम्याही छापून आल्या. त्यानंतर शिवणखेड गावात त्याचा सत्कार आयोजित केला. गावचा तरूण मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाल्याचा गावाला आनंद झाला. सत्कारासाठी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील गावात आले. या कार्यक्रमाला त्याच्या ताफ्यात पोलिसांच्या तीन वाहने होत्या.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिंग फुटलं
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर गावात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्याचं बिंग फुटलं. अनेक मोठ्या दैनिकात उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या देखल छापून आल्या. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या तरुणाने घरातल्या लोकांनाही खोटी माहिती दिली होती. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्याने काही दिवसापूर्वी फोन केला. लातूर येथील फॅमिली कोर्टात मी न्यायाधीश आहे. सरकारी कामासाठी मला अहमदपूर येथील शिवणखेडला जायचं आहे. पोलीस बंदोबस्त पाठवून द्या, असं सांगत पोलीस बंदोबस्त मागून घेतला. पोलिसांची गाडी आणि त्याच्या कुटुंबियांची गाडी घेऊन तो त्याचे मूळ गाव शिवणखेडमध्ये दाखल झाला. त्या वेळेस अहमदपूर पोलीस ठाण्यातूनही पोलीस गाड्या त्याच्या सेवेत दाखल झाल्या होत्या आपल्या मतदारसंघातील तरुण न्यायाधीश झालाय त्याचं कौतुक करायला आमदार देखील दाखल झाले होते. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावातील विविध विकास कामाचा उद्घाटन या तोतया न्यायाधीशाच्या उपस्थितीत पार पडला.
तोतया न्यायाधीशास सोलापुरातून ताब्यात घेतलं
लातूर कोर्टात याबाबत चर्चा रंगली. लातूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. त्यानंतर लातूर पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांनी मग गोड बोलून या तोतया न्यायाधीशास सोलापुरातून ताब्यात घेतलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे रूप दाखवलं. मग तोतया न्यायाधीशाला आपली चोरी पकडल्याचे लक्षात आले. मी खोटे बोलून हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत
मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून गावात सत्कार स्विकारणारा व्यक्ती..लातूर पोलिसांना मात्र लातूर येथील फॅमिली कोर्टात न्यायाधीश असल्याचे भासवत होता. हा भास निर्माण करत त्यांना पोलीस ताफ्यासह गावात एन्ट्री केली होती. गावात लागलेली बॅनर आणि तो सांगत असलेल्या गोष्टीत तफावत ही पोलिसांच्या चाणक्य नजरेतून कशी सुटली याची चर्चा आता रंगत आहे.
हे ही वाचा :