धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
वसई-विरारमधील पाणीटंचाईचा मुद्दा घेत बच्चू कडू यांनी वसई-विरारमधील स्थानिक आमदाराला आणि सरकारला धारेवर धरले.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत प्रचारसभा घेत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना असतानाही मनसे, वंचित आणि परिवर्तन आघाडीच्या माध्यमातूनही नेतेमंडळी मैदानात उतरली आहे. आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून उमेदवार उभे केले असून नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्तीचे उमेदवार धनंजय गावडे यांच्या प्रचारासाठी आज विरारच्या बालाजी बँक्वेट हॉल येथे त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. जाती व धर्माच्या आधारावर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दोन नारे देण्यात आले आहेत. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है.. या दोन घोषणांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
वसई-विरारमधील पाणीटंचाईचा मुद्दा घेत बच्चू कडू यांनी वसई-विरारमधील स्थानिक आमदाराला आणि सरकारला धारेवर धरले. “देशाच्या आर्थिक राजधानीच्या बाजूला असलेल्या या भागात अद्याप पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, हे दुदैव आहे,” असे कडू यांनी म्हटले. तर, नालासोपारा विधानसभा निवडणुकीत ठाकूर गटासाठी इतर उमेदवार “मॅनेज” केले गेले आहेत. ते एक्का- दुकी आहेत, त्यांनी प्रहारचा उमेदवार धनंजय गावडे याला खरी लढत देणारा उमेदवार म्हटले आहे, असेही कडू यांनी म्हटले. तर, धर्माच्या मुद्द्यावरुन होणाऱ्या प्रचारावरही त्यांनी हल्लाबोल केला. “धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असताना धर्म-जातिवर राजकारण करणे योग्य नाही”. “येथे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना ‘कटेंगे तो बटेंगे नही’ असे म्हणणे योग्य नाही. जनता आता जागरूक झाली आहे आणि या व्यवस्थेविरोधात आवाज उठवत आहे” असेही त्यांनी म्हटले.
भाजपवर हल्लाबोल, निवडणूक आयोगाला टोला
“धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे, भाजपाने आपल्या कामावर निवडणुका लढवाव्यात,” अशी टीका बच्चू यांनी केली. “निवडणूक आयोग हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु सध्या तो पक्षपातीपणा करत आहे. उध्दव ठाकरेंच्या बॅग तपासणीच्या घटनेवरून हे स्पष्ट होते,” असा टोलाही त्यांनी आयोगाला लगागवला.
लाडकी बहीणवरही टीका
गरीबांना रेशन दुकानातून स्वस्त कांदा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, राज्य सरकारच्या “लाडकी बहिण योजना” वर टीका करताना म्हटले की, सरकार महागाई वाढवून मिळालेली रक्कम परत घेत आहे. दरम्यान, या सभेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, ज्यामुळे नालासोपारा विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्तीचा उत्साह उंचावला आहे.
हेही वाचा
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला