Latur Pollution AQI : दिलासादायक बातमी! लातूरमधील प्रदूषणाची स्थिती नियंत्रणात, महापालिकेकडून राबवण्यात आल्या 'या' उपाययोजना
Latur AQI : लातूरमधील AQI मध्ये 2015 पासून 67 टक्के घट झाल्याचं चित्र आहे. तर यंदाच्या वर्षातला लातूरचा AQI हा समाधानकारक असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे.
लातूर : जागतिक प्रश्न म्हणून समोर आलेल्या प्रदूषणाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असल्याचं चित्र आहे. मात्र महाराष्ट्रातील लातूर (Latur) शहरांमध्ये प्रदूषणाची (Pollution) पातळी कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यातच अतिशय आशादायक चित्र मागील पाच ते सहा वर्षांमध्ये निर्माण झालायं. 2015 आणि 16 या वर्षात असलेल्या प्रदूषण पातळीमध्ये जवळपास 67 टक्के घट झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे 2015 पासून आकडेवारी पाहता लातूरमधील यंदाची आकडेवारी ही आशा पल्लवित करणारी आहे.
लातूर शहातील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे या प्रदूषणाच्या पातळीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली असल्याचं सांगण्यात येतंय. सध्या संपूर्ण राज्याला प्रदूषणाने विळखा घातला असल्याचं चित्र आहे. त्यातच मुंबईसह राज्यातील उर्वरित भागातील स्थिती देखील चिंताजनक असल्याचं समोर आलं. पण लातूरमधील AQI हा नियंत्रणामध्ये असल्याने काहीसा दिलासा मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय.
लातूरमधील AQI मध्ये घट
2015 पासून विचार केला लातूरच्या AQI मध्ये जवळपास 67 टक्के घट झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान 2015 ते 2023 मध्ये लातूरमधील AQI ची स्थिती सविस्तर जाणून घेऊयात.
वर्ष | AQI |
2015 -16 | 389 |
2016 -17 | 345 |
2017 -18 | 377 |
2018 - 19 | 369 |
2019 - 20 | 311 |
2020 - 21 | 177 |
2021 - 22 | 171 |
2022 - 23 | 157 |
लातूर महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाने केलेल्या काम मागील पाच वर्षात दृष्टिक्षेपात येते आहे. 2015 - 16 च्या तुलनेत 2022 - 23 मध्ये 67% प्रदूषण पातळी कमी करण्यात यश मिळवलंय. अशी माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली.
महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजना
प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासठी लातूर महानगरपालिकेकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर आठ ठिकाणी कारंजे उभे करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यापैकी चार ठिकाणी कारंजे उभे करण्यात आलेत. तर उर्वरित चार ठिकाणी काम कारंजे उभं करण्याचं काम सुरु आहे. तसेच बांधकाम काम कचऱ्याचे प्रोसेसिंग करून त्यापासून पेव्हर ब्लॉक तयार करण्याचे युनिट हे 50 टन प्रतिदिन क्षमतेचे असणार आहे. या युनिटचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
ओल्या कचऱ्यापासून ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्याकरिता चार विकेंद्रीत बायोगॅस प्रकल्प करण्याचे प्रस्ताव होता. त्यापैकी तीन प्रकल्पाची प्रतिदिन एक टन क्षमता आहे आणि एका प्रकल्पाची प्रतिदिन पाच टन क्षमता आहे. त्यापैकी दोन प्रकल्प सध्या कार्यरत असून त्यापासून वीजनिमिर्ती करण्यात येतेय. दररोज या दोन प्रकल्पातून 300 युनिट वीज निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे लातूरमधील कचरा उचलणाऱ्या गाड्या या इव्हेइकल आहेत. तसेच कचरा जाळणाऱ्या आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर आर्थिक दंडात्मक कारवाई केली जाते.
शहरामध्ये जे बांधकाम चालू आहेत त्या ठिकाणी धूळ उडणे कचरा होणे हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जातात. डस्ट सेप्रेशन मशीन येत्या चार दिवसांमध्ये शहरात कार्यान्वित होतील. या मशीनच्या साह्याने रस्त्यावर होणारी जी धूळ आहे ती कमी होण्यास मोठी मदत होईल. रस्ते साफ करण्यासाठी जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाचा उपयोग केला जातोय.
हेही वाचा :
Pune AQI Today : पुण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली, काय आहे नेमकं कारण?