(Source: Poll of Polls)
Latur News : मराठा आरक्षण आंदोलनाचा लातूर बाजार समितीवर परिणाम, पण शेतकऱ्यांनी शोधून काढला उपाय
Latur News : लातूरमधील बाजार समिती मागील तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. पण आता पुन्हा एकदा या शेतमालाची आवाक सुरु करण्यात आलीये.
लातूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनाचा परिणाम बाजार समितीवर (Bazar Samiti) देखील झाल्याचं पाहायला मिळालं. कारण मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूरची (Latur) बाजार समिती ही दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बाजार समितीमध्ये शेतमाला व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता. पण यावर उपाय काढत शेतकऱ्यांनी शेतमाल कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये पाठवण्यास सुरुवात केलीये.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वाल्मिक जयंतीची एक दिवस सुट्टी असं सलग तीन दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. त्यातच सातत्याने सुरु असलेल्या रास्ता रोको, धरणे आणि ठिय्या आंदोलनामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शेतममाल घेऊन येणाऱ्या वाहनांना दोन दोन दिवस रस्त्यावरच थांबावं लागलं होतं.
शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान
दरम्यान या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवाक मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आलीये.
शेतकऱ्यांना द्यावे लागले अधिकचे पैसे
आंदोनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनेक अडचणींना समोरं जावं लागलं. त्यातच काही शेतकऱ्यांनी 25% सोयाबीन वाहनात चढवले. पण ते बाजार समितीमध्ये पोहचलण्यासाठी तब्बल तीन दिवसांचा कालवधी लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक पोत्यामागे अधिकचे पैसे देण्याची वेळ आली. अशाच प्रकारची अडचण अनेक शेतकऱ्यांना आली. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल रात्रीच्या वेळी बाजार समिमध्ये पाठवण्यास सुरुवात केली.
शेतकरी आनंदात
दरम्यान लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा शेतमालाची आवाक सुरु झाल्यानंतर शेतमालाचे भाव देखील वाढले. यामुळे तीन दिवसांत शेतकऱ्यांना झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यास मदत होऊ शकते. या कारणामुळे शेतकऱ्यांचा उत्साह देखील वाढला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर सध्या या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आवाक सुरु असल्याचं चित्र आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. अनेकांनी या आंदोलनाना पाठिंबा देखील दर्शवला. त्याच पार्श्वभूमीवर बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळालं.
हेही वाचा :
कोणाला मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ? या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय?