Latur Earthquake : हासोरी गावात भूकंपाचा पुन्हा धक्का, 16 सप्टेंबर ते आजपर्यंत नऊ धक्के
Latur Earthquake : लातूर जिल्ह्यातील हासोरी हे गाव दोन महिन्यांपासून सतत भीतीच्या छायेत आहे. या भागात काल रात्रीही भूकंपाचे धक्के बसले. या भागात 16 सप्टेंबर ते आजपर्यंत भूकंपाचे नऊ धक्के बसले आहेत.
Latur Earthquake : लातूर (Latur) जिल्ह्यातील हासोरी (Hasori) हे गाव दोन महिन्यांपासून सतत भीतीच्या छायेत आहे. या भागात काल (11 ऑक्टोबर) रात्रीही भूकंपाचे धक्के बसले. लातूर भूकंप वेधशाळेत या भूकंपाची तीव्रता 1.6 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंप वेधशाळा ही 1.5 रिश्टर स्केलच्या पुढील नोंदी ठेवते. या भागात 16 सप्टेंबर ते आजपर्यंत भूकंपाचे नऊ धक्के बसले आहेत.
आजपर्यंतच्या भूकंपाच्या नोंदी
हासोरी गावात 16 सप्टेंबर, 25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर, 29 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबर 9 ऑक्टोबरला दोन (यात सर्वात मोठा धक्का हा 2.1 रिश्टर स्केल रात्री बसला होता)आणि 11 ऑक्टोबर रोजी भूकंपाची नोंद करण्यात आली, अशी माहिती भूकंप वेधशाळा अधिकारी किशोर सिंह परदेशी यांनी दिली आहे. लातूरच्या भूकंपमापन केंद्रापासून 49 किलोमीटर ते 59 किलोमीटर अंतरावर हासोरी भागामध्ये या भूकंपाची नोंद झाली आहे.
भूकंपाच्या भीतीने गाव रात्रभर जागं
5000 लोकसंख्येचे हासोरी हे गाव भूकंपाच्या भीतीने रात्रभर जागे राहत आहे. दिवसा गावामध्ये वृद्ध आणि लहान मुलं असतात. तरुण शेतात कामाला जात आहेत. प्रशासनास याची माहिती आहे. मात्र त्यावर काय उपाय योजना करावी, आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती प्रशासनही देत नाही. अधिकारी तात्पुरते येतात आणि निघून जातात. लोकांना काय करावे कळत नाही. यामुळे या भागात फक्त भीती आहे. हतबलता येथील वृद्धांच्या चेहऱ्यावर पाहता येते. या सर्व परिस्थितीची माहिती गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिली होती. मागील अनेक दिवसातून भूगर्भातून आवाज येतोय अशा स्वरुपाची माहिती प्रशासन वरिष्ठ कार्यालयाला कळवत राहिलं. विविध ठिकाणची पथक इथे पाहणीला आल्यानंतर तो भूगर्भातील आवाज नव्हे तर तो भूकंपच होता हे समोर आलं. भूकंप होत आहेत याची माहिती प्रशासनाला कळाल्यानंतरही अद्यापही कोणतीही हालचाल होत नाही आणि नागरिकांच्या मनातल भय संपायचं नाव घेत नाही.
लातूरकर आणि भूकंप
1993 साली गणेश विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भूकंपाचा धक्का बसला होता. यात हजारो लोकांचे प्राण गेले होते. त्यातच भूकंपाचे धक्के बसत अल्याने हासोरी गावातील नागरिकांना 29 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाची आठवण होत आहे. 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा दिवस. संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरुन गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने सात हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला, 16 हजार लोक जखमी झाले. तर 52 गावांमधील 30 हजार घरे धरणीच्या पोटात गडप झाली.
संबंधित बातम्या
Maharashtra Latur News : हासोरी परिसरात 24 तासांत भूकंपाचे दोन धक्के; नागरिक भयभीत