Latur Crime News : कस्टडी ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, स्वतःच्याच डोक्यात झाडली गोळी; लातूरच्या पोलीस दलात खळबळ
Latur Crime News : पोलीस कर्मचारी पांडुरंग पिटले यांनी शुक्रवारी अचानक स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लातूर : पोलीस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, कस्टडी ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शासकीय बंदुकीतून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आहे. हेड कॉन्स्टेबल पांडुरंग पिटले (वय 49) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पिटले यांनी स्वतःच्या डोक्यात शासकीय बदुकीतून गोळी झाडून घेतल्याची घटना शुक्रवारी (22 सप्टेंबर) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कस्टडी रुमसमोर घडली. तर, जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार, पांडुरंग शंकरराव पिटले असे गोळी झाडून घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाणे पत्र्याच्या शेडमध्ये असल्याने त्या ठाण्याचे पक्के बांधकाम नाही. यामुळे तेथील आरोपींना ठेवण्यासाठी गांधी चौक पोलिसांच्या कस्टडी रुममध्ये हलविण्यात येते. मागील काही महिन्यांपासून पांडुरंग पिटले हे गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कस्टडी गार्ड म्हणून ड्यूटी करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ते गांधी चौकातील कस्टडीत एकही आरोपी नसताना नियमित कर्तव्यावर आले होते.
तर, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्याजवळील शासकीय एसएलआर बंदुकीतून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी डोक्यातून आरपार गेली आहेत. यामुळे तेथेच ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना तत्काळ लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे त्यांच्या डोक्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची गांधी चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलीस दलात खळबळ...
पांडुरंग पिटले यांनी शुक्रवारी अचानक स्वतःवर गोळी झाडून घेतल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिटले हे शुक्रवारी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कस्टडी गार्ड म्हणून ड्यूटीवर होते. विशेष म्हणजे यावेळी एकही आरोपी कस्टडीत नव्हता. मात्र, अचानक पिटले यांनी स्वतःवर गोळी झाडून घेण्याचे कारण काय? त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची पोलिसांकडून नोंद करण्यात आली असून, तपास सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Latur News : लग्न मोडल्यानंतर झालेल्या खर्चासाठी तगादा, मुलाने व्हिडीओ व्हायरल करत जीवन संपवलं