पुन्हा कोसळला जीवघेणा बॅनर; लातूरमध्ये दिशादर्शक फलक अंगावर पडून तरुणाचा मृत्यू, 2 गाड्यांचेही नुकसान
मुंबईतील घाटकोपर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी महाकाय बॅनर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, आजही राज्यातील अनेक ठिकाणी अनेकठिकाणी विनापरवाना फलक झळकल्याचे दिसून येतात
लातूर : राज्यात मान्सुनचे आगमन झाले असून आज पुण्यासह विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) पडला. लातूर, धाराशिवमध्येही वादळी वाऱ्यासह मेघगर्जना झाली. त्यावेळी, लातूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक नाम फलक पडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. वादळी वाऱ्याने दिशादर्शक फलक (Accident) कोसळला अन् तीन वाहनांचे नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने काही लोकांचे प्राण थोडक्यात बचावले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मुंबईतील घाटकोपर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी महाकाय बॅनर कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, आजही राज्यातील अनेक ठिकाणी अनेकठिकाणी विनापरवाना फलक झळकल्याचे दिसून येतात. हेच दिशादर्शक फलक असेल किंवा जाहिरातीचा फलक हलगर्जीपणाने लावला असेल तर मृत्यूला कारणीभूत ठरतो, याचा प्रत्यय लातूरमध्ये आला. लातूर जिल्ह्यात काहीशी अशीच घटना घडली आहे. या घटनेमुळे घाटकोपरच्या घटनेची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. लातूर जिल्ह्यातील आष्टा येथील रहिवासी ज्ञानेश्वर बालाजी साके हा तरुण दुचाकीवरून जात होता. राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना दिशादर्शक फलक वादळी वाऱ्यामुळे अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई येथील घाटकोपरच्या घटनेची राष्ट्रीय महामार्गावर पुनरावृत्ती झाली असे म्हणता येईल.
याबाबत सविस्तर वृत असे की, अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी पाटी राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर आहे. अहमदपूरकडून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या अंगावर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर लावलेला दिशादर्शक नामफलक खाली पडला. या दुर्घटनेत फलकाजवळ असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर, या घटनेत इतरही दोन गाड्यांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा
Photos: कुठं साचलं पाणी, कुठं झाडं पडली, पुण्यात वाहतूक कोंडी; पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; बीडमधील निकालानंतर सोशल मीडियातून वाद, पोलीस अलर्ट