(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Football : भावांनो तालीम, मंडळ तुमचं असलं, तरी कोल्हापूर आपलंय, हे विसरू नको!
Kolhapur Football : फुटबॉल पंढरी कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळाला जवळपास 90 वर्षाचा ऐतिहासिक आणि देदीप्यमान परंपरा लाभली आहे. या खेळाला राजाश्रय देण्याचे काम लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी केले.
Kolhapur Football : नुकत्याच पार पडलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपमध्ये कतारपासून ते संपूर्ण देशात फक्त आणि फक्त चर्चा झाली फुटबाॅल पंढरी असलेल्या कोल्हापुरातील वातावरणाची. कोणाची चर्चा झाली नसेल तेवढी कोल्हापूरची चर्चा झाली. अर्थातच, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. फुटबॉल पंढरी कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळाला जवळपास 90 वर्षाचा ऐतिहासिक आणि देदीप्यमान परंपरा लाभली आहे. या खेळाला राजाश्रय देण्याचे काम लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी केले. तेव्हापासून आजतागायत कोल्हापूरमध्ये फुटबॉल जिवंत ठेवण्याचे काम शहरांमधील पेटांमधून, तालमींमधून तसेच मंडळांमधून केलं जात आहे. मात्र, त्याला गेल्या काही दिवसांपासून मैदानातील हुल्लडबाजी चांगलंच गालबोट लागलं आहे.
त्यामुळे कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा एकदा वादात सापडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थातच त्याला कारण आहे मंगळवारी झालेल्या हाणामारीचे. मैदानातील मारामारी हे कोल्हापूरच्या फुटबॉलला लागलेलं ग्रहण आहे असेच खेदाने म्हणावे लागेल अशी काही परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झाली आहे. स्टेडियममध्ये चाहत्यांमधील इर्ष्येतून एकमेकांची आई बहिण काढून शिव्या देणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे आदी प्रकार होत असल्याने कोल्हापूरच्या फुटबॉलला हिंसक वळण लागत आहे. त्यामुळे याबद्दल मंडळांनी तसेच प्रतिष्ठित शहरातील तालीम आहेत त्यांनी याच्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. अर्थात, तुमची तालीम असली, तुमचं मंडळ असलं, तरी त्याच्याही पलीकडे जाऊन कोल्हापूर सर्वप्रथम आपलं आहे याचा विसर या मंडळींना पडला आहे का? असाही प्रश्न यातून निर्माण होत आहे.
तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी कोल्हापूरमध्ये फुटबॉल हंगामाला सुरुवात झाली. त्यामुळे हंगामातील पहिल्या सामन्याची आतुरता होती. आणि अर्थातच पहिल्या सामन्याला ग्राउंडवरही चाहत्यांनी गर्दी केली. मात्र, पहिल्याच सामन्यात एकमेकांना लाथा बुक्क्या घालण्यापर्यंत प्रकार घडला. त्यामुळे पहिल्या दिवशी या स्पर्धेला गालबोट लागले. ही स्पर्धा शांततेत पार पाडावी यासाठी सर्वच घटकातून आवाहन करण्यात आलं आहे. पोलिसांकडूनही फुटबॉल हंगाम शांततेत पार पाडण्यासाठी आवाहन केलं जात आहे. हुल्लडबाजांना रोखण्यासाठी सीसीटीव्हीची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, हे सर्व असतानाही केवळ आणि केवळ ईर्ष्येतू एकमेकांना मारहाण कितपत योग्य आहे यांचा त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवाजी तरुण मंडळ, फुलेवाडीची विजयी सलामी
दरम्यान, काल पहिल्या दिवशी सलामीच्या सामन्यात बलाढ्य शिवाजी तरुण मंडळांने खंडोबा तालीम मंडळावर तीन विरुद्ध एक गोलने विजय मिळवला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळाचा चार विरुद्ध शून्य गोलने धुव्वा उडविला. शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ यांच्यातील सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी, सामन्याचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, केएसए अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, विफा महिला फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, यशराजे, तेज घाटगे, दीपक शेळके, सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदू बामणे, विश्वास कांबळे, संभाजी मांगुरे, अमर सासने, नितीन जाधव, मनोज जाधव, भाऊ घोडके आदी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या