Shiv sena morcha against MP Sanjay Mandlik : बेंटेक्स निवडलेल्या बंडखोर खासदार संजय मंडलिकांच्या घरावरही शिवसैनिकांचा धडक मोर्चा!
बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे. या मोर्चात शिवसैनिकांसह मतदार सहभागी होतील, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला.
Shiv sena morcha against MP Sanjay Mandlik : गेले ते बेटेक्स राहिले ते सोनं म्हणणारे तसेच बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढणाऱ्या कोल्हापूर खासदार संजय मंडलिक यांनी शांतीत क्रांती करत एकनाथ शिंदेंच्या कळपात सामील झाले. त्यांच्या बंडखोरीनंतर जिल्ह्यामध्ये संतप्त पडसाद उमटले होते. निवडून आले सहा मतदारसंघातून आणि निर्णय घेतला कागलमधून अशीही टीका त्यांच्यावर झाली. आता याच बंडखोर संजय मंडलिकांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा धडकणार आहे.
या मोर्चामध्ये शिवसैनिकांसह मतदारही सहभागी होतील, असा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला. मंडलिक यांच्या निवासस्थानावर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गद्दारीबद्दल मंडलिकांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले की, संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या जनतेचा भावनांना तडा दिला. त्यांना जाब विचारण्यासाठी निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता हा मोर्चा निघेल.
या मोर्चाला शाहूपुरी जिमखाना येथून मोर्चाला प्रारंभ होणार होऊन तो शिवाजी पार्क येथील मंडलिकांच्या निवासस्थानावर धडकेल. कोल्हापूरची जनता खासदार मंडलिक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे संजय पवारांनी नमूद केले.
रक्ताने पत्र लिहून पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवारांकडून सत्कार
दरम्यान, आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचली होती. या दौऱ्यामध्ये अनेक शिवसैनिकांनी स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांना पाठिंबा व्यक्त केला. या सर्व शिवसैनिकांना कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांनी आपल्या निवासस्थानी बोलवून औक्षण केलं. जिल्ह्यातील चाळीसहून अधिक शिवसैनिकांचे पवार यांच्या कुटुंबियांनी औक्षण केले. अशा निष्ठावंतांसाठी माझ्याकडे शब्द नसल्याची प्रतिक्रिया संजय पवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले. आदित्य ठाकरे यांच्यासाठी झालेली गर्दी उस्फूर्तपणे होती, ही येणाऱ्या विजयाची नांदी असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या