Shivsena Morcha against MP Sanjay Mandlik : गद्दार खासदार म्हणत, बेंटेक्स सोनं घातलेले फोटो झळकावत संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिकांचा मोर्चा
Shivsena Morcha against MP Sanjay Mandlik : कोल्हापूरचे बंडखोर शिवसेना खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांनी आज मोर्चा काढला आहे.
Shivsena Morcha against MP Sanjay Mandlik : कोल्हापूरचे बंडखोर शिवसेना खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याच्या विरोधात कोल्हापुरात शिवसैनिकांनी आज मोर्चा काढला आहे. संजय मंडलिक यांच्या घरावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चामध्ये बेन्टेक्स सोन घातलेले संजय मंडलिक यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून खासदार संजय मंडलिक यांना जाब विचारण्यात येणार आहे.
बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी विशेष म्हणजे शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर बंडखोरांविरोधात पहिला मोर्चा काढला होता. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते 24 कॅरेट सोने असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांनीच बंडखोरी केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप करत जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आज त्यांच्याविरोधात मोर्चा काढला आहे.
त्यांनी केलेली चूक सुधारली नाही, तर त्यांचा दोन लाख मतांनी पराभव केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. मोर्चामध्ये संजय मंडलिक यांचे बेंटेक्स घातलेले फलक मोर्चामध्ये चांगलेच लक्ष वेधून घेत होते. खासदार गद्दार अशाही घोषणाही संतप्प शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला अभूतपूर्व भगदाड पडले आहे. आमदार प्रकाश आबिटकर, अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत.
शिवसैनिकांकडून सर्व बंडखोरांच्या घरावर मोर्चा
कोल्हापूर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी प्रत्येक बंडखोराच्या घरावर मोर्चा नेऊन जाब विचारला आहे. संजय मंडलिकांच्या घरावर नेलेला हा बंडखोरांच्या घरावरील शेवटचा मोर्चा होता. अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील कार्यालयावर नेलेल्या मोर्चावेळी शिवसैनिकांची पोलिसांची चांगलीच झटापट झाली होती.
आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेने शिवसैनिकांमध्ये चैतन्य
या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा कोल्हापुरात पार पडली. त्यांचे या यात्रेत स्वागत कसे होणार? याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष होते. आजरा तालुका कोल्हापूर शहरापासून तब्बल 86 किमी अंतरावर आहे. कोल्हापूर शहरामध्ये शिवसेना खोलवर रुजली असली, तरी आजऱ्यामध्ये शिवसेनेचा कोणताही मातब्बर नेता नसताना आदित्य यांच्या स्वागताला झालेली गर्दी ही नक्कीच जवळचा भाग म्हणून बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार संजय मंडलिक यांना नक्कीच विचार करायला भाग पडणारी होती.
आदित्य यांच्या स्वागताला जसा शिवसैनिक होता, त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकही होता. त्यामुळे भविष्यातील आडाखे आणि गटाचा विचार करून बंडाळी केली असली, तरी वाटचाल नक्कीच सोपी नाही, याची जाणीव या गर्दीने करून दिली आहे.