Satej Patil : 'आमचं ठरलंय' नंतर आता सतेज पाटलांची नवीन टॅगलाईन; म्हणाले, 'या' टॅगलाईनखाली काँग्रेस लढणार!
आमचं ठरलंय ही टॅगलाईन कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, तर अवघ्या राज्यभरात पोहोचली. धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी आम्ही सुद्धा ध्यानात ठेवलंय अशी प्रतिक्रिया दिली होती.
कोल्हापूर : हटके निवडणूक कॅम्पेन आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना नेहमी ओळखले जाते. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापुरात (Kolhapur) महापालिकेत तोच प्रयोग राज्याला पॅटर्न सतेज पाटील यांनी दिला. 2019 मध्ये त्यांनी ठरवून आघाडीच्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा पराभव केला होता. त्यावेळी तत्कालिन शिवसेनेचे संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असूनही सतेज पाटील यांनी जुना राजकीय वचपा काढण्यासाठी 'आमचं ठरलंय' म्हणत असे राज्यस्तरावरील नेत्यांना न जुमानता स्वतःची यंत्रणा वापरून संजय मंडलिक यांना विजयी केले होते.
आमचं ठरलंय ही टॅगलाईन कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, तर अवघ्या राज्यभरात पोहोचली. धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी आम्ही सुद्धा ध्यानात ठेवलंय अशी प्रतिक्रिया दिली होती. इतका हा आमचं ठरलंय वरून राजकीय सामना रंगला होता. यानंतर राजाराम कारखान्यातही कंडका पाडायचा ही टॅगलाईन चांगली चर्चेचा विषय ठरला होता.
'आमचं ठरलंय' नंतर आता 'जनतेनंच ठरवलंय'
आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा सतेज पाटील यांनी नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे. त्यांनी आज (6 मार्च) कोल्हापूरमध्ये बोलताना 'जनतेनंच ठरवलंय' या टॅगलाईन खाली काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पाटील यांनी सांगितले की, इतिहासात न जाता मी भविष्याचा वेध घेणार असून राज्यातील जनता विरोधात महायुती अशीच ही लढाई असेल जनता स्वतः आता निवडणूक हातात घेणार असून 'जनतेनं ठरवलंय' या टॅगलाईन खाली काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमधील नेत्यांवरही टीका केली. जर आदराचे स्थान असेल तर शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्या, असे आव्हान त्यांनी हसन मुश्रीफ यांना दिले. शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते असेही ते म्हणाले. वैयक्तिक टिप्पण्णी करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी यासाठी विनंती केली
संभाजी राजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी राज्यभरात स्वराज्य संघटना उमेदवार उभे करणार नसल्याचेही सांगितले. त्यांच्या या निर्णयावरती पाटील यांनी आनंद व्यक्त करताना आभार मानले. ते म्हणाले की, त्यांची घर म्हणून सुद्धा जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला. शाहू महाराजांनी ही निवडणूक लढवावी यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावा यासाठी आमचा प्रयत्न होता, असेही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकतीने सामोरे जाऊ, आमच्या महाविकास आघाडीकडून जागांवरती किमान चर्चा होत आहे. मात्र, महायुतीमध्ये अजूनही गोंधळ कायम असल्याचे आपण पाहत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या