Satej Patil on Hasan Mushrif : तर शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावे! सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना खोचक टोला
महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यानंतर कोल्हापुरातील महायुतीमधील हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांविषयी आदर असल्याचे सांगत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू नये असे वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) कोट्यातून उमेदवारी निश्चित झाली आहे. महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्यानंतर कोल्हापुरातील महायुतीमधील वजनदार नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी शाहू महाराजांविषयी आदर असल्याचे सांगत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू नये असे वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी खोचक शब्दात समाचार घेताना त्यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराजांच्या उमेदवारीवर टीका करणाऱ्यांचा सुद्धा समाचार घेतला. शाहू महाराजांविषयी आदर असेल, तर बिनविरोध निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी दिले. सतेज पाटील म्हणाले की, सक्षम उमेदवार देणे आणि निवडून आणणे हे आमचे धोरण आहे.
संभाजीराजेंचा स्तुत्य निर्णय
सतेज पाटील यांनी संभाजीराजे यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, त्यांनी घर म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि तसाच स्तुत्य निर्णय घेतला आहे. आम्ही त्यांना सुद्धा वारंवार विनंती केली होती की, शाहू महाराजांनी ही निवडणूक लढावी. पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावेत हा आमचा प्रयत्न होता.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ
त्यांनी सांगितले की, शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते. वैयक्तिक टीका करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील. आदराचे स्थान असेल तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे असे म्हणत त्यांनी मुश्रीफ यांना टोला लगावला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने सामोरे जाऊ, आमच्या महाविकास आघाडीच्या किमान जागांवर चर्चा आहेत, पण महायुतीत अजूनही गोंधळ आहे आपण पाहतो, अशी टीका त्यांनी केली.
इतिहासात न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे, राज्यात जनता विरोधात महायुती अशी लढाई असणार आहे. जनता स्वतः ही निवडणूक हातात घेणार असून 'जनतेनं ठरवलंय' या टॅगलाईन खाली काँग्रेस लोकसभा लढवणार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या