अप्रमाणित मिश्र खतांची विक्री; कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघाला केंद्र सरकारचा दणका
प्रमाणित रासायनिक मिश्र खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने आठ राज्यांमध्ये धाडी टाकल्या. यामध्ये राज्यातील 6 कंपन्यांचे मिश्र खते अप्रमाणित आढळून आले.
Kolhapur : अप्रमाणित मिश्र खतांची विक्री प्रकरणी राज्यातील सहा कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्रमाणित रासायनिक मिश्र खतांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाने आठ राज्यांमध्ये धाडी टाकल्या. यामध्ये महाराष्ट्रातील सहा कंपन्यांचे मिश्र खते देखील अप्रमाणित आढळून आले आहेत.
माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समुहाशी संबंधित असलेल्या लोकमंगल बायो टेक कंपनीसह सांगलीतील बसंत अँग्रो टेक, नागपूर येथील विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघ, औरंगाबाद येथील देवगिरी फर्टिलायझर्स या संस्थांचा यामध्ये समावेश आहे.
2019 मध्ये तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी लोकमंगलवर फौजदारीचे आदेश दिले होते. मात्र कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई टाळली. दरम्यान, केंद्रातर्फे राज्यातील या सहा संस्थावर कारवाईचे आदेश देणारे पत्र राज्याला पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या पत्रात केंद्राच्या एकात्मिक खते व्यवस्थापन प्रणालीतून अनुदानावर खते विकत घेण्याचा लोकमंगलचा परवाना तत्काळ रद्द करावा. शेतकऱ्यांना अप्रमाणि खते विकणाऱ्या या कंपनीविरोधात पोलिसांकडे एफआय़आर दाखल करावी. अशा सूचना केंद्राने पत्राद्वारे कळवल्या आहेत.
दरम्यान, केंद्राकडून लोकमंगलच्या खतांची तपासणी झाली होती. त्यात ते अप्रमाणित असल्याने निष्पन्न झाले असले तरी अद्याप कारवाई संदर्भात कोणत्याही सुचना प्राप्त झालेल्या नसल्याची माहिती सोलापूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. "लोकमंगल तर्फे निर्मिती करण्यात आलेले 18:18:10 हे मिश्र खत अप्रमाणित आढळून आले आहे. 30 एप्रिल 2022 रोजी केंद्रीय पथकाने या खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते.
फरिदाबाद येथे या नमुन्याची तपासणी करण्यात आली. सदर खताच्या नमुन्याचे विश्लेष्ण आमच्या क्वॉलिटी कंट्रोल विभागाला प्राप्त झाले आहे. 18:18:10 ग्रेडच्या खतामध्ये मुलद्रव्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. नायट्रोजनचे प्रमाण हे 18 ऐवजी 16.61, फॉस्परसचे प्रमाण 18 ऐवजी 14.18 तर पोटॅशचे प्रमाण मात्र 10 ऐवजी 20.88 इतके आढळून आले आहे. केंद्रीय शासनाने ठरवलेल्या प्रमाणानुसार या खतांचे उत्पादन झालेले नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे हे खत अप्रमाणित ठरवण्यात आले आहे. पुढील कारवाई संदर्भात केंद्राकडून कोणत्याही सुचना आमच्या पर्य़ंत प्राप्त झालेल्या नाहीत" अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या