Raju Shetti: ...तर जिल्हा बँकेतील विद्वान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटीलचा नाच ठेवा; राजू शेट्टींचा खोचक टोला
Raju Shetti : राजकीय द्वेषातून अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला देणार नसाल, तर राजकारण करत बँकेत बसा. विद्ववान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा, असा टोला राजू शेट्टी यांनी केडीसीसीला लगावला.
Raju Shetti : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) मनमानी कारभारात विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाटमधील नियोजित सेवा संस्थेला अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला नियमानुसार देता येत नाही, असे केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी सांगितल्यानंतर आक्रमक झाले. बँकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बँकेच्या दारात उपोषण सुरु करण्यात आले आहे.
स्वाभिमानीकडून उपोषण सुरु करण्यात आल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री उपोषणकर्त्यांना ताब्यात घेऊन मार्केट यार्डात ठेवले आहे. रात्री दोन वाजता जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बँक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा
राजू शेट्टी म्हणाले की, नियम सर्वांना सारखाच लावावा. मनमानी पद्धतीने कामकाज करायचे नाही. नाही तर बँकेची सगळी माहिती माझ्याकडे आहे, असा इशाराही दिला. शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नसेल तर आमच्या ठेवी परत द्या आणि गौतमी पाटीलला नाचवा. शेट्टी पुढे म्हणाले की, "राजकीय द्वेषातून अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला देणार नसाल, तर राजकारण करत बँकेत बसा. विद्ववान संचालकांच्या मनोरंजनासाठी गौतमी पाटील यांचा नाच ठेवा."
प्रकरण नेमकं आहे तरी काय?
शिरोळ तालुक्यातील आकिवाट येथील नियोजित विमलनाथ चौगुले विकास सेवा सोसायटीच्या स्थापनेसाठी अपेक्षित कर्ज पुरवठ्याचा दाखला जिल्हा बँक देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून अकिवाटचे सरपंच विशाल चौगुले जिल्हा बँकेसमोर उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी माजी खासदार शेट्टी, प्रा. जालंदर पाटील, वैभव कांबळे, बंडू पाटील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.
बीआरएसकडून मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर; राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केलं आहे. बीआरएसच्या चालीमागील डाव आहे तरी कोणाचा? अशी राजकीय पटलावर चर्चा सुरु असतानाच आता त्यांनी राजू शेट्टी (Raju Shetti on BRS) यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. राजू शेट्टी यांनी या ऑफरचा गौप्यस्फोट केला आहे. शेट्टी यांनी सांगितले की, मला देखील मुख्यमंत्रिपदाची ऑफर आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव संपर्कात आहेत. दरम्यान, राजू शेट्टी यांनी केसीआर यांनी दिलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली असून स्वतंत्र राहून लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या