(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : जे अजितदादांच्या मनात तेच राज्याचे धोरण, एकनाथ शिंदे साखर सम्राटांच्या ताटाखालचे मांजर; राजू शेट्टींचा हल्लाबोल
साखर कारखानदारांकडे साखरेचा चढलेला भाव इथेनाॅलमधून मिळालेला पैसा याचा विचार करता साडेचार हजार कोटी शिल्लक असताना आम्ही चारशे रुपयेची मागणी करत आहे, मात्र ते द्यायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
कोल्हापूर : राज्याचे साखर धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयामध्ये 17 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली असली, तरी या बैठकीला काहीच अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साखर सम्राटांच्या (Sugar Factory) ताटाखालचे मांजर झाल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti on Eknath Shinde) यांनी केली. साखर कारखानदारांकडे साखरेचा चढलेला भाव इथेनाॅलमधून मिळालेला पैसा याचा विचार करता साडेचार हजार कोटी शिल्लक असताना आम्ही चारशे रुपयेची मागणी करत आहे, मात्र ते द्यायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. साखर सम्राटांसमोर देवेंद्र फडणवीसांचं (Devendra Fadnavis) सुद्धा काही चालत नाही, अशी टीका त्यांनी केली.
उत्पन्न वाटप सूत्राचा (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉर्म्युला-आरएसएफ) साखर कारखानदारांनी सोयीने वापर करून घेत असल्याने ही फसवाफसवी आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेकवेळा पटवून सांगूनही काहीच झालेलं नाही. त्यांच साखर कारखानदारासंमोर काही चालत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
एकनाथ शिंदे, फडवणीस फक्त म म म्हणण्याचं काम करणार
राजू शेट्टी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आम्ही जनतेची नाळ ओळखणारे समजत होतो. मात्र, ते साखर सम्राटांच्या ताटाखालील मांजर झाले आहेत. एकरकमी एफआरपी देण्यासाठी त्यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर शासन निर्णय होण्यासाठी त्यांच्याकडे अनेकवेळा उंबरे झिजवले. मात्र, तो निर्णय साखर सम्राटांच्या दबावामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे साखर कारखानदारांसोबतच्या बैठकीत साखर कारखानदार म्हणतात बैठक झाली, मात्र शासन निर्णय कोठे झाला? त्यामुळे धोरण काही असलं तरी अजित पवारांच्या मनात असेल, साखर कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असेल हे मला माहित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, फडवणीस फक्त म म म्हणण्याचं काम करणार आहेत. त्या बैठकीतून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
400 रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू
दुसरीकडे, गेल्या हंगामातील उसाला 400 रूपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर रोखण्याचे आंदोलन करत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गुरूवारी आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत सर्वच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांना उत्पन्न वाटप सूत्रानुसार (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉर्म्युला-आरएसएफ) पैसे देवू असे सांगत 400 रूपये देण्यास नकार दिला. संघर्षाशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसेल तर 400 रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू, एक कणही साखर बाहेर सोडणार नाही, असा खणखणीत इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या