Raju Shetti on Shaktipeeth EXpressway: चंदगडच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी मतदारसंघातून शक्तिपीठ घेऊन जावा असं पत्र दिलं; राजू शेट्टींची जोरदार टीका
Raju Shetti on Shaktipeeth EXpressway: चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतंत्र भूमिका घेत पर्याय सुचवताना चंदगडमधून शक्तिपीठ महामार्ग नेण्यासाठी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते.

Raju Shetti on Shaktipeeth EXpressway: शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रणकंदन सुरू आहे. शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार असला तरी त्याला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधून कडाडून विरोध होत आहे. सुपीक पट्ट्यातून हा महामार्ग जात असल्याने कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या एकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा बळ दिलं आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीसह विविध संघटना शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतंत्र भूमिका घेत पर्याय सुचवताना चंदगडमधून शक्तिपीठ महामार्ग नेण्यासाठी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. यानंतर आता चंदगड आणि गडिंग्लज भागातील शेतकरी आक्रमक झाला आहे.
मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी पत्र दिलं
या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जात आहे तो आम्ही होऊ देणार नाही. गडहिंग्लज भागामध्ये याच मुद्द्यांवरून रास्ता रोको आंदोलन करणार आहे. चंदगडच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना खुश ठेवण्यासाठी मतदारसंघातून शक्तीपीठ घेऊन जावा असे पत्र दिल्याचं राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान शेतकरी कधीही विकासाच्या आडवा येत नाही. मात्र, गरज नसलेला महामार्ग का लादला जातोय? असा पुनरुच्चार राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. ते पुढे म्हणाले की पांडुरंग पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडं घातलं आहे. तो नक्कीच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वातावरण निर्माण करेल असा आशावाद शेट्टी यांनी व्यक्त केला.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी पुलावर शक्तिपीठ महामार्ग विरोधात महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं होतं. पंढरपूरमध्ये आषाढीला महामार्ग रद्द करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे म्हणत पांडुरंगाला सुद्धा साकडं घालण्यात आलं. शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूरमध्ये आंदोलनाची व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























