Rajaram Sakhar Karkhana : आम्हाला मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याची निवडणूक घ्यावी; सभासदांची प्रादेशिक सहसंचालकांकडे मागणी
प्रारूप व अंतिम मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी निश्चित केलेली 31 ऑक्टोबर तारीख बदलून 31 मार्च 2023 करावी, अशी विनंती सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांना केली आहे.
Rajaram Sakhar Karkhana : अर्हता दिनांकाच्या तांत्रिक अडचणीने राजाराम सहकारी साखर कारखान्याचे काही सभासद मतदानापासून वंचित राहणार असल्याने मतदानाचा हक्क मिळाल्यानंतरच राजाराम कारखान्याच्या निवडणूका घ्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सभासदांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांना दिले आहे. निवेदनातून प्रारूप व अंतिम मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी निश्चित केलेली 31 ऑक्टोबर तारीख बदलून 31 मार्च 2023 करावी, अशी विनंती केली आहे. अन्यथा मतदानाच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्याबद्दल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राजाराम कारखान्यासाठी मतदारयादी तयार करण्यासाठी 31 ऑक्टोबर ऐवजी 31 मार्च 2023 करावी. प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी निश्चित केलेल्या 31 ऑक्टोबरच्या आदेशान्वये कारखान्याने मतदारयाद्या तयार केल्यास आम्हाला मतदानाचा मुलभूत कायदेशीर हक्क बजावता येणार नाही व असंख्य सभासद संस्थेच्या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
का करण्यात आली मागणी?
ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम आणि सहकारी संस्थाचा निवडणूकीचा कार्यक्रम एकाच कालावधीत येत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना आपला सहभाग नोंदवता यावा यासाठी राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केल्या असतील तेथून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु करा
दुसरीकडे, काही सभासदांनी राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरु करण्याची मागणी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे केली आहे. निवडणुकीला उशीर होत असेल, तर कारखान्यावर प्रशासक नेमा, अशीही मागणी केली आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत संपून पावणे तीन वर्ष झाली आहेत, शेतकऱ्यांचे हित पाहून निवडणूक प्रक्रिया सुरु करा, अशी मागणीही सभासदांनी केली आहे.
राजाराम कारखान्याचे 1346 सभासद अपात्र
दरम्यान, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे बोगस व कार्यक्षेत्राबाहेरील 1346 सभासदांना अपात्र ठरवण्यात आल्याने सत्ताधारी महादेवराव महाडिक गटाला तगडा झटका बसला आहे. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून विरोधक सतेज पाटील गटाला या निर्णयाने मोठे बळ मिळाले आहे. 1346 सभासदांना प्रादेशिक सहसंचालक आणि तत्कालीन सहकार पणन मंत्री यांनी अपात्र ठरविले होते. त्या 1346 सभासदांच्या अपात्रतेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सत्तारुढ गटाला धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या