निष्ठा, प्रामाणिकपणाला मारलंय फाट्यावर, मतदान होतंय नोटांच्या गठ्ठ्यावर; महाडिक, बंटीसाहेब टोकाच्या ईर्ष्येसाठी कसला पायंडा पडतोय याचा विचार करा; सभासदांच्या कानपिचक्या!
सभासदांनी मत देताना सोबत चिठ्ठीही दिली आहे. यामध्ये नेत्यांना कानपिचक्या देत भानावर येण्याचा सल्ला दिला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांच्यावर सभासदांनी सर्वाधिक राग काढला आहे.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये महाडिक गटाने आघाडी घेतली आहे. मात्र, या चार फेऱ्यांमध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये राजकीय राड्याने नाराज झालेल्या सभासदांनी मत देताना सोबत चिठ्ठीही दिली आहे. यामध्ये नेत्यांना कानपिचक्या देत भानावर येण्याचा सल्ला दिला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांच्यावर सभासदांनी सर्वाधिक राग काढला आहे. सभासदांनी चिठ्ठ्यांमधून व्यक्त केलेला राग अतिशय शेलक्या भाषेत आहे.
जाणून घेऊया सभासदांनी कोणत्या भाषेत सल्ला दिला आहे...
एका चिठ्ठीत म्हटले आहे की, "निष्ठा प्रामाणिकपणाला मारलंय फाट्यावर, मतदान होतंय नोटांच्या गठ्यावर, कोणी 10 कोणी 5 किती वाटले नाही मोजदाद. मा. महाडिकसाहेब, मा. बंटी साहेब टोकाच्या ईर्ष्येपायी कसला नि कुठला पायंडा पडतोय याचा यापुढे तरी विचार करा. सभासदांना मताचे मोल घेत असताना होत आहेत गुदगुल्या, निवडणुकीनंतर कामासाठी नेत्यांपुढे जाताना काढाव्या लागतील नाकदुऱ्या."
माजी चेअरमन सर्जेराव माने यांच्यासाठी खास
आपण ज्या कारखान्याबद्दल गरळ ओकून बोलत आहात त्या कारखान्याच्या आपण चेअरमन या सर्वोच्च पदावर होता. असा रंगबदलू सरडा चेअरमन झाला नाही आणि होणारही नाही. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पार्टी बदलून सरडा चेअरमन आता आपले असे होणार आहे बाच्या बा गेला आणि बोंबलताना हात असं होणार आहे लक्षात ठेवा.
सर्जेराव माने सरांचे ऐकून नको ती टीका करू नका
महाडिक साहेब कारखाना अगदी व्यवस्थित चालू आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची लग्न होत नाहीत. त्यांच्या ऑर्डर तेवढ्या काढा रिटायरमेंटला आली, तरी ती परमनंट नाहीत. बंटी पाटील साहेब तुम्ही सर्जेराव माने सरांचे ऐकून नको ती टीका करु नका. तो माणूस तुमचा पण विश्वासघात करेल. तुम्ही जर कारखान्याला सहकार्य केलं तर कारखाना आणखी फास्ट चालेल.
प्रतिष्ठा पणाला लावून वारेमाफ खर्च करण्यात येत आहे
श्री छत्रपती कारखाना आज रोजी चालू असलेली निवडणूक व त्यामध्ये प्रतिष्ठा पणाला लावून वारेमाफ खर्च करण्यात येत आहे. मग हा खर्च कोठून वसूल करणार हे समजत नाही. आम्ही सभासदांनी कोणावर विश्वास ठेवावा हा चिंतेचा विषय आहे. आम्हाला एकच अपेक्षा आहे, तुम्हापैकी कोणीही सत्तेत आल्यानंतर इथेनाॅल, को-जनरेशन असे विभाग चालू करावे, सभासदांना चांगला दर देता येईल. बाकी तुम्हा दोघांचे आरोप प्रत्यारोप आम्हास मान्य नाही.
एक गरीब सभासद, मीडियाला देणे.
26 वर्ष सत्ता भोगून म्हातारपणी शहाणे झालास काय?
माने सर जरा निष्ठा जपा, खालेल्या घराचे वासे मोजू नका. 26 वर्ष सत्ता भोगून म्हातारपणी शहाणे झालास काय? जरा कमी गट बदला. प्रत्येकवेळी सत्तेसाठी आणि पैशासाठी सरड्याप्रमाणे वागणे बदला. नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या