Ajit Pawar in Kolhapur | आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करतात, मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो : अजित पवार
आमचे मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे पाच वाजता उठून कामाला लागतो. याचाच अर्थ सरकार 24 तास काम करणारं असल्याचे अजित पवार म्हणाले.
कोल्हापूर : विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर बोलू नये, त्यांनी दीड रुपया तरी दिला का? ही योजना पुढे सुरू हवी असेल, तर महायुती सरकार पुन्हा आणावे लागेल. मी शब्दाचा पक्का आहे आर्थिक शिस्त मी लावू शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना केले.
खुर्चीच्या लालसेनं सत्तेत गेलो नाही, तर राजाच्या विकासासाठी सत्तेत
अजित पवार म्हणाले की, एकोप्याने काम करा बघा आणि हा काम करेल, तो काम करेल असा अजिबात चालणार नाही. ते पुुढे म्हणाले की महामार्गामुळे कोल्हापूर शहरात पुराचे पाणी तुंबते. याबाबत आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो असून याबाबत लवकरच तोडगा काढू. ज्या विकासकामाला लोकांचा विरोध आहे ती कामे आम्ही करणार नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. खुर्चीच्या लालसेनं सत्तेत गेलो नाही, तर राजाच्या विकासासाठी सत्तेत आम्ही गेलो असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.
कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलताना त्यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले की कागल, चंदगड, गडहिंग्लजपुरतं मर्यादित राहून चालणार नाही. राष्ट्रवादीचे अनेक मतदारसंघांमध्ये आमदार राहिलेला हा जिल्हा आहे. ते दिवस आपल्याला परत परत आणायचे आहेत. पुढे महापालिका नगरपंचायत निवडणूक आहे त्यावेळी कस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी पहाटे पाच वाजता उठून कामाला लागतो
खोट्या प्रचाराला बळी पडू नका असेही अजित पवार यांनी सांगितले. काँग्रेसने केवळ मते घेण्याचं काम केलं असून आमचं सरकार 24 तास काम करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आमचे मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे पाच वाजता उठून कामाला लागतो. याचाच अर्थ सरकार 24 तास काम करणारं असल्याचे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, इचलकरंजीमधील मेळाव्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जनतेसमोर जात असताना विकासकामे समोर ठेवून जावा. मागे काय घडलं, कसं घडलं यावर टीका करण्याची गरज नाही. आपलं काम सर्व काही बोलून जातं, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले. शीतल फराकटे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. या टीकेला विरोध करताना अजित पवार यांनी फराकटे यांना सुनावले. विरोधक खोटा प्रचार करून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही निवडणुकीतील अपयशाने म्हणून खचून जाऊ नका आणि यश आलं म्हणून हरळून जाऊ नका. महायुतीत असणाऱ्या सर्व पक्षांसोबत रहा असं अजित पवार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या