Kolhapur News : जयसिंगपूर बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय पॅनेलचा एकतर्फी विजय; भाजप पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा
जयसिंगपूर बाजार समितीमध्ये 7 जागा बिनविरोध झाल्याने 11 जागांवर निवडणूक झाली. रविवारी मतदान घेऊन सायंकाळी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला. तब्बल 92.16 टक्के मतदान झाल्याने उत्सुकता वाढली होती.
Kolhapur News : जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली आहे. सर्वपक्षीय सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने सर्व 18 जागांवर विजय मिळवत भाजप समर्थित पॅनेलचा धुव्वा उडवला. जयसिंगपूर बाजार समितीमध्ये 7 जागा बिनविरोध झाल्याने 11 जागांवर निवडणूक झाली. रविवारी मतदान घेऊन सायंकाळी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला. तब्बल 92.16 टक्के मतदान झाल्याने उत्सुकता वाढली होती.
जयसिंगपूर बाजार समितीसाठी शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्रित आले होते. यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अनिलराव यादव, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्यासह अन्य नेतेमंडळींनी ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केल्याने 7 जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, अन्य जागांवरून मतभेद झाल्याने निवडणूक लागली होती. 11 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदानानंतर सायंकाळी शिरोळ येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत मतमोजणी पार पडली.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्यांची बाजी
दुसरीकडे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी विकास सत्तारूढ आघाडीने 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवत विरोधी आघाडीचा धुव्वा उडवला. राष्ट्रवादी काँग्रेस 6, काँग्रेस 4, जनसुराज्य 3, शिवसेना शिंदे गट 2, ठाकरे गट 1 जागा मिळाली. विरोधी शिव शाहू परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला. विरोधी आघाडीतून व्यापारी अडते गटात नंदकुमार वळंजू यांनी विजय मिळवत शिव-शाहू परिवर्तन आघाडीचे खाते उघडले. हमाल मापाडी गटातून अपक्ष बाबूराव खोत विजयी झाले.
गडहिंग्लज बाजार समिती बिनविरोध
दरम्यान, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक अनेक दशकांनंतर प्रथमच बिनविरोध झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनी बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तब्बल 169 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
स्वाभिमानी मतदाराकडून मतपेटीतून पैसे परत
कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात आहे तसेच घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मिळालेले हजार रुपये तसेच मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने विजयी झेंडा फडकवला असला, तरी कार्यकर्त्यांनी चिट्टीतून व्यक्त केलेल्या भावना मात्र चांगल्याच लक्षवेधी ठरल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या नातलगांच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांनी थेट आपल्या कारभाऱ्यांचे कान टोचले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :