Hasan Mushrif on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही; मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. यासाठी ते आंतरवाली सराटीतून मुंबईत पायी दिंडी काढणार आहेत.
कोल्हापूर : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. यासाठी ते आंतरवाली सराटीतून मुंबईत पायी दिंडी काढणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात बोलताना मोठा दावा केला आहे.
आम्ही आरक्षण देणार
हसन मुश्रीफ कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांना 20 तारखेला मुंबईत यायचीच गरज पडणार नाही. त्यापूर्वीच आम्ही आरक्षण देणार आहोत, असा दावा त्यांनी केला.
सुनील तटकरेच हिशोब देतील
दुसरीकडे, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी इतका पैसा कुठून आणला? असा सवाल केला आहे. याबाबत त्यांना विचारले असताना मुश्रीफ यांनी आमचे नेते सुनील तटकरेच हिशोब देतील, अशी भूमिका मांडली.
अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार पक्षाच्या प्रचारासाठी देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कारचं वाटप करण्यात येणार आहे. तब्बल 40हून अधिक कार अजित पवार गटाकडून खरेदी करण्यात आल्या आहेत.
कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पावर काय म्हणाले?
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापुरातील 100 कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे अशी शिंदे गटाची इच्छा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला उशीर होणार आहे, त्यामुळे उद्घाटनापेक्षा लोकांच्या सोयीसाठी कामाला सुरुवात करूयात अशी विनंती मी शिंदे गटाला करणार आहे. शिंदे गटाच्या भाजप विलीनीकरणावर आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. याआधी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एकाच राज्यात सत्ता आली, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या यात्रेचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही, असं देखील मुश्रीफ यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या