Belgaum News : बेळगावात सोन्या चांदीची कोट्यवधीची उलाढाल; साडेतीन मुहुर्तावर सोने खरेदी करण्यासाठी झुंबड
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या खरेदीसाठी लोकांनी सराफी दुकानात मोठी गर्दी केली होती. बेळगावमध्ये सोन्या चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली.
Belgaum News : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीच्या खरेदीसाठी लोकांनी सराफी दुकानात मोठी गर्दी केली होती. बेळगावमध्ये सोन्या चांदीची कोट्यवधींची उलाढाल झाली. दिवाळी पाडव्याच्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा प्रती दहा ग्रॅम दर 52 हजार 800 रूपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रती दहा ग्रॅमला 48 हजार 820 रू इतका होता. चांदीचा दर किलोला 60 हजार 900 रूपये इतका होता. चोख सोन्याची आणि तयार दागिन्यांची खरेदी लोकांनी मोठ्या प्रमाणावर केली.
सोन्याची चेन,कर्णफुले,नेकलेस, ब्रेसलेट,अंगठी आणि विविध प्रकारच्या हाराना अधिक मागणी होती. चांदीचा तांब्या,ताट, फुलपात्र,अत्तर दाणी,गुलाब दाणी ,समया आणि नाणी यांना अधिक मागणी होती.चांदीच्या मूर्तींना देखील मागणी होती.सकाळपासूनच ग्राहकांनी दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
केवळ बेळगाव जिल्ह्यातून नव्हे तर चंदगड,गडहिंग्लज भागातून देखील सोन्या चांदीची खरेदी करण्यासाठी आले होते. अनेक ग्राहकांनी साडेतीन मुहुर्तावर सोने खरेदी करण्यासाठी अगोदर बुकिंग केले असल्याची माहिती बेळगावातील पोतदार ज्वेलर्स या प्रख्यात पेढीचे संचालक मिहिर पोतदार यांनी दिली.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 15 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री
दुसरीकडे दिवाळीतील धनत्रयोदशीलाही ग्राहक सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तसेच, कार, मालमत्ता इत्यादींमध्ये प्रचंड गुंतवणूक करत आहेत. दिवाळीत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगलाच गेला. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात तब्बल 15 हजार कोटींच्या दागिन्यांची विक्री झाली. मुंबईतील सराफा बाजारात 600 कोटींची उलाढाल, सोन्याबरोबरच चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
गेल्या वर्षीपासून या वर्षीच्या धनत्रयोदशीपर्यंत सोन्याने गुंतवणूकदारांना सुमारे 6 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दराबाबत बोलायचे झाल्यास त्याच्या किंमतीत 3 टक्क्यांपर्यत मोठी घसरण नोंदवली गेली. डॉलरची मजबूती आणि देशात तसेच जगात सातत्याने वाढणारी महागाई हे चांदीच्या किंमतीत घसरण होण्याचे प्रमुख कारण आहे.