Marathi Sahitya Akdami Award : यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार 'रिंगाण' कादंबरीला जाहीर, कोल्हापूरच्या कृष्णात खोत यांचा लेखनाविष्कार
Kolhapur News : यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार हा कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या कांदबरीला जाहीर करण्यात आला आहे
कोल्हापूर : यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार (Sahitya Akadami Award) हा कोल्हापुरातील (Kolhapur) कृष्णात खोत (Krushnat Khot) यांच्या 'रिंगाणा' (Ringan) या कांदबरीला (Novel) जाहीर करण्यात आला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात साहित्य अकादमी पुरस्कार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 रोजी करण्यात येणार आहे.
कृष्णात खोत हे रिंगाण या कादंबरीचे लेखक आहेत. त्यांनी त्यांच्या या कादंबरीमध्ये विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे. दरम्यान साहित्य क्षेत्रातील साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. त्याच पुरस्कारने कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी गौरविण्यात येणार आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार का दिला जातो?
साहित्य आणि भाषा क्षेत्रातील असाधारण योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारसाचे संवर्धन आणि जतन करते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.
24 भाषांसाठी दिला जातो पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 24 भाषांना दिला जातो. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, यात आसामी, बंगाली, डोगरी, कन्नड, मराठी आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांचा समावेश आहे. या भाषांमधील उत्कृष्ट साहित्याला या पुरस्काराने गौरविले जाते.
साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली?
साहित्य अकादमीची स्थापना 1954 मध्ये भारतीय भाषांमधील साहित्य आणि साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्याचवेळी अध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन, अबुल कलाम आझाद, झाकीर हुसेन, उमाशंकर जोशी, महादेवी वर्मा आणि रामधारी सिंग दिनकर हे पहिल्या परिषदेचे सदस्य होते.
भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारसाचा प्रचार आणि जतन करणे हा साहित्य अकादमी पुरस्काराचा उद्देश आहे. भारताबाहेर भारतीय साहित्याचा प्रचार करण्यासाठी अकादमी जगातील विविध देशांसोबत साहित्य आदान प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात येते.