Kolhapur News : कोल्हापूर, सांगलीवर अलमट्टी धरणाच्या उंचीची टांगती तलवार! राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
राज्य सरकार आणि NIH संस्थेमध्ये प्राथमिक चर्चा यापूर्वी झाली आहे. संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांना औपचारिक पत्र पाठवण्यात आले असून ज्यात अभ्यासासाठी आकारले जाणारे शुल्क कळवण्यास सांगितले आहे.
almatti dam height : कोल्हापूर आणि सांगली येथील पुरावर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटर परिणामाचा (almatti dam height) सिम्युलेशन आणि हायड्रोडायनॅमिक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उत्तराखंडमधील रुरकी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी (NIH) च्या तज्ज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार आणि NIH संस्थेमध्ये प्राथमिक चर्चा यापूर्वी झाली आहे. या चर्चेनंतर संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांना औपचारिक पत्र पाठवण्यात आले असून ज्यात अभ्यासासाठी आकारले जाणारे शुल्क कळवण्यास सांगितले आहे.
कर्नाटक अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घालत असून, त्याला कोल्हापूर, सांगलीतून कडाडून विरोध होत आहे. धरणाच्या बॅकवॉटर परिणामामुळे नद्यांना फुगवटा येत आहे हे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासात दिसून आल्यास राज्य सरकार कर्नाटकला धरणाची उंची वाढवण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकते. कृष्णा नदी खोरे विकास महामंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर आणि सांगली येथील पुरावर अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिणामाचा अभ्यास यापूर्वी करण्यात आला होता, परंतु तो अजूनही आहे की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे.
मात्र, यावेळी सरकार अधिक वैज्ञानिकदृष्ट्या पुन्हा अभ्यास करण्याच्या विचारात आहे. हा अभ्यास करताना मुख्य नद्यांवर बांधण्यात आलेले बंधारे, पूल यांचाही परिणाम विचारात घेतला जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी हालचाली
दरम्यान, कर्नाटककडून कृष्णा नदीवरील कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतकी वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अलमट्टी धरणावर 26 अतिरिक्त दरवाजे बसवले जाणार आहेत. हे दरवाजे बसवण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. अलमट्टी धरणाची उंची 524.256 मीटर इतके वाढवण्यासाठी कर्नाटकला कृष्णा पाणी वाटप लवाद-2 कडून परवानगी मिळाली आहे.
सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची एनआयएचच्या तज्ज्ञांशी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही अलमट्टी धरण अधिकाऱ्यांसोबत डेटाची देवाणघेवाण करतो. या अभ्यासासाठी, आम्ही ते पुन्हा करू. या अभ्यासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी कर्नाटक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची विनंती वरिष्ठ राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांना करू.
दुसरीकडे अलमट्टी धरणात सांगली, कोल्हापूर महापुराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केलेल्या मुकुंद घारे समितीने अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याचा उल्लेख केला आहे. या धरणात ऑगस्टअखेर 519.64 मीटर पाणीपातळी ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्याने 2005 मध्ये सांगली आणि कोल्हापुरातील महापूर स्थिती भीषण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या