Satej Patil on Budget : हा तर निवडणूक प्रलोभन संकल्प! जनमत विरोधात असल्याने भुलवण्यासाठी पोकळ घोषणांचा संकल्प; आमदार सतेज पाटलांचा टोला
जनमत विरोधात असल्याने भुलवण्यासाठी पोकळ घोषणांचा संकल्प केल्याची टीका विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील (Satej Patil on Budget) यांनी केली आहे.
Maharashtra Budget 2023 : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत अनेक लोकप्रिय घोषणा केल्याने हा चुनावी जुमला असल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून होत आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील (Satej Patil on Budget) यांनीही जनमत विरोधात असल्याने भुलवण्यासाठी पोकळ घोषणांचा संकल्प केल्याची टीका केली आहे. विरोधी पक्षनेते अजित ठाकरे, उद्धव ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनीही बजेटवरून टीकास्त्र सोडले आहे. सतेज पाटील यांनी बजेटवरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, जनमत आपल्या विरुद्ध असल्याची जाणीव झाल्याने लोकांना भुलवण्यासाठी केलेल्या पोकळ घोषणांचा हा संकल्प आहे. शेती, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत जनतेच्या तोंडी पाने पुसलेली आहेत!
हा तर "निवडणूक प्रलोभन संकल्प" ! जनमत आपल्या विरुद्ध आहे याची जाणीव झाल्याने लोकांना भुलवण्यासाठी केलेल्या पोकळ घोषणांचा हा संकल्प असून शेती, रोजगार अशा मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत जनतेच्या तोंडी पाने पुसलेली आहेत!
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) March 9, 2023
लोकसभेसोबत त्यांना विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत
दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. निवडणुका डोळयासमोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प आहे. देवदर्शन बजेट. करून करून भागले आणि देवदर्शनाला लागले. लोकसभेसोबत त्यांना विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या असल्याने आम्ही तयारीला लागलो आहोत. आता उद्धव आणि नाना पटोलेंसोबत बैठक आहे, असेही पवार यांनी सांगितलं.
हा गाजर हलवा अर्थसंकल्प
महाविकास आघाडी सत्तेत असताना केंद्र सरकार आमच्या बाजूला नव्हतं. जीएसटीची थकबाकी होती. आता महाशक्तीचा पाठिंबा असलेलं सरकार कसं कारभार करतं तुम्हाला माहीत आहे. आज काही शेतकऱ्यांशी बोललो अद्यापही त्यांच्या बांधावर पंचनामा करण्यासाठी अधिकारी पोहचले नाहीत. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केल्या आहेत. पण शेतकऱ्यांना हमखास भाव कधी येणार, हे पाहावं लागणार आहे. आजच्या अर्थसंकल्प गरजेल तो बरसेल काय? असा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
10 हजार रूपये शेतकरी तोट्यामध्ये
राजू शेट्टी यांनीही सरकारचे बजट म्हणजे चाट मसाला सारखं असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, तेवढ्या पुरतं चविष्ठ वाटतं. परंतु, अंतिमत: हाताला काहीच लागत नाही अशी स्थिती एकूण या बजेटची आहे. 6 हजार रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. परंतू शेतकऱ्यांना जी रासायनिक खते विकत घ्यावी लागतात, त्या खतामध्ये गेल्या वर्षभरात झालेली वाढ आणि त्या खर्चामध्ये जवळपास 17 ते 18 हजार रूपयांनी वाढ झाली आहे आणि बदल्यामध्ये आमचे अर्थमंत्री आम्हाला केवळ 6 हजार रूपये देतात म्हणजे अजून 10 हजार रूपये शेतकरी तोट्यामध्ये गेला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या