Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्याचा पारा 40 अंशावर; कागल तालुक्यात एकाच गावातील उष्माघाताने तिघांचा मृत्यू? आरोग्य विभागाने केला खुलासा
जिल्ह्याच्या सरासरी तापमानात तब्बल तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. रात्रभरही वातावरणात उष्णता जाणवत होती.
Kolhapur Weather : कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात वैशाख वणवा पेटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या घरात गेला असून दिवसभर उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण होऊन गेले आहेत. जिल्ह्याच्या सरासरी तापमानात तब्बल तीन अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर वातावरणात भयंकर उकाडा जाणवत होता. रात्रभरही वातावरणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे नागरिक हैराण होऊन गेले आहेत. हवेत प्रचंड उकाडा वाढल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पाऊस झाला नाही. हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यानंतर पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तापमान वाढत चालल्याने शहरातील वर्दळीवर परिणाम झाला असून ते दुपारी रस्ते ओस पडत आहेत.
कागल तालुक्यातील मृत्यूवर आरोग्य विभागाकडून खुलासा
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात (Kagal) तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची चर्चा रंगली होती. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कागल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार बेलवळेमधील तिन्ही मृत्यू उष्माघाताने झाले नाहीत. अन्य कारणाने झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी भर उन्हात जाणे टाळावे, फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत. भरपूर पाणी प्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
तिघांच्या मृत्यूने खळबळ
कागल तालुक्यातील बेलवळे खुर्दमध्ये सोमवारी दोन महिला व एका व्यक्तीचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई शिवाजी पाटील (वय 54), साताप्पा भाऊ पाटील (वय 52) व जनाबाई विठ्ठल कांबळे (वय 80) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची चर्चा रंगल्यानंतर आरोग्य विभागाने मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाने हे मृत्यू उष्माघाताने झालेले नसून अन्य कारणाने झाले असल्याचे म्हटले आहे. तिन्ही मृत्यू उष्माघाताने झाला नसल्याचा प्राथमिक अहवाल तालुका आरोग्य विभागाकडून वरिष्ठांकडे सोपवण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मयत लक्ष्मीबाई पाटील या सोमवारी शेतातून परत आल्यानंतर दुपारी बारा वाजता घरी परतल्या होत्या. त्यांनी तहान लागल्याने पाणी मागून घेतल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि जागीच कोसळल्या. यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू उष्माघाताने न होता अन्य कारणाने झाला असल्याचा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सातापा पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचेही निधन झाले. त्यांचा मृत्यू मेंदूतील रक्तस्त्रावाने झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. वृद्ध जनाबाई कांबळे यांनाही धाप वाढल्यानंतर चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या