(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 29 एप्रिलपर्यंत बंदी आदेश लागू; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा या शांततामय मार्गाने साजरी करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रेसाठी उपस्थित लोकांसाठी हा नियम लागू होणार नाही.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) 29 एप्रिलपर्यंत बंदी आदेश (Prohibition order in Kolhapur District) लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार पाच किंवा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असेल. तसेच जमाव करणे, मिरवणुका व सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या यात्रा, जत्रा किंवा ऊरुसांमध्ये मोबाईलद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तेढ निर्माण होवू नये, यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी हे बंदी आदेश दिले आहेत.
कोणाला आदेश लागू होणार नाही?
आदेशात म्हटले आहे की, सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा या शांततामय मार्गाने साजरी करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रेसाठी उपस्थित लोकांसाठी हा नियम लागू होणार नाही. तसेच, ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते. ज्या व्यक्तींनी पोलिस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलिस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींनाही या आदेशातून वगळण्यात येईल.
जिल्ह्यातील नागरिकांनी (Prohibition order in Kolhapur District) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे, याला बंदी असेल.
इतर महत्वाच्या बातम्या