दादा, काय झालं रे? शेतात निपचित पडलेल्या भावाजवळ गेला अन् विजेचा धक्का बसला; दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने कोल्हापूर हळहळलं
Kolhapur News : भात रोपण आटपून तणनाशक मारायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विजेचा शॉक लागून मृ्त्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील कोपार्डे गावात घडली.
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे येथील कडवी नदीजवळ असणाऱ्या शेतात रोप लावून तणनाशक मारण्यास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा अतिउच्च विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन दुर्दैवी अंत झाला. सुहास कृष्णा पाटील (वय-36) आणि स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) या दोन्ही सख्या भावांची नाव आहेत. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कोपार्डे गावावर शोककळा पसरली आहे.
भावाला काय झालं पाहायला गेला अन् शॉक लागला
सुहास आणि स्वप्नील दोघे भाऊ भात रोप लावण आटपून दुपारी पिकांवर तणनाशक मारण्यासाठी शेताकडे गेले होते. तणनाशक मारत असताना सुहासला विजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला. दादा काय झालं असं म्हणत स्वप्नील त्यांच्याजवळ गेला असता त्यालाही वीजेचा धक्का बसून दोघे भाऊ शेतात निपचित पडले. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आपली दोन्ही मुले अजून घरी का आली नाहीत म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील तेथे गेले असता दोन्ही मुले गतप्राण झाल्याने ते भांबवून गेले. त्यांनी आरडा-ओरड केली असता गावातील लोकांनी धाव घेऊन त्यांना आधार दिला. दोन्ही कमवती मुले काळाने हिरावून घेतल्याने वडील हताश झाले.
दरम्यान या घटनेचा पंचनामा शाहूवाडी पोलिसांनी करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रूग्णालयात रवाना करण्यात आले.
ही बातमी वाचा: