Kolhapur Rain Update: पन्हाळा तालुक्यातील भूस्खलानाच्या धास्तीने धारवाडीमधील ग्रामस्थांचे स्थलांतर; हुपरी-इंगळी दरम्यान रस्ता खचला
डोंगराला भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदारांसह प्रशासनाने धारवाडीत तळ ठोकला. इर्शाळवाडी घटना ताजी असल्याने धारवाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य केल्याने 48 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नावलीपैकी धारवाडीचे स्थलांतर करण्यात आले आहे. ‘गाडमाळी’ नावाच्या शेती असलेल्या भागात डोंगराला भेगा पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करून 48 कुटुंबांचे स्थलांतर केले. डोंगराला भेगा पडल्याने भूस्खलनाचा धोका आहे. डोंगराला भेगा पडल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदारांसह प्रशासनाने धारवाडीत तळ ठोकला. इर्शाळवाडी घटना ताजी असल्याने धारवाडीतील ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य केल्याने 48 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. यामधील अनेकांनी नातेवाईकांकडे सहारा घेतला आहे. 15 लोक निवारा केंद्रात आहेत. स्थलांतरित कुटुंबाचे पशुधन गावामध्येच आहे.
हुपरी- इंगळी दरम्यान रस्ता खचला
दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील हुपरी-इंगळी दरम्यान कोल्हापुरे मळा भागात रस्ता खचल्याने धोका निर्माण झाला आहे. रस्ता खचल्यानंतर प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद केली आहे. सुमारे पन्नास मीटरपर्यंत रस्त्यास भेग पडून त्याचा भराव लगतच्या ओढ्यात गेला आहे. अन्य ठिकाणी रस्ता एकाबाजूने खचला आहे.
खासबाग मैदानाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट
दुसरीकडे, कोल्हापुरात खासबाग मैदानाची संरक्षण भिंत कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नाटक पाहण्यासाठी आलेल्या दोन महिला या ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या. नंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पण त्यापैकी एकीचा मृत्यू झाला. अश्विनी यादव असे मृत महिलेचे नाव असून संध्या तेली ही महिला जखमी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांना बाहेर काढण्यात आले.
या घटनेनंतर आता खासबाग मैदानाच्या संरक्षक भिंतीचे कोल्हापूर मनपाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरुवात केली. त्यात भरावासाठी माती, जुन्या भिंतीतील चुना, वाळू, सिमेंटसारख्या साहित्याचे परीक्षण केले जाणार आहे. भेगा पडलेल्या ठिकाणी ग्राउटिंग किंवा पिना मारणे अशा उपाययोजना आवश्यकतेनुसार केल्या जातील. खड्या भिंतींना आधार देणारी भिंतही बांधण्याचे नियोजन आहे.
घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पती अर्जुन गुडुळकर देखील जखमी झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या