Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी इंचाइंचाने कमी होत असल्याने पूरस्थिती कायम; कडवी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला
कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यावरील पाणी ओसरत असले, तरी पंचगंगा नदीचे तुलनेत अतिशय संथ गतीने कमी होत आहे. पाणी पातळीत वाढ न झाल्याने पुरबाधित गावांना तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) पावसाने सलग उघडीप दिल्याने पुराचे पाणी झपाट्याने ओसरण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या 82 पैकी आता 53 बंधारे पाण्याखाली आहेत. गेल्या 24 तासांपासून पंचगंगा नदी पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ झाल्यानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने आता इंचाइंचाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 41 फुट 3 इंचावर आहे.
जिल्ह्यातील बंधाऱ्यावरील पाणी ओसरत असले, तरी पंचगंगा नदीचे तुलनेत अतिशय संथ गतीने कमी होत आहे. पाणी पातळीत वाढ न झाल्याने पुरबाधित गावांना तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फुट आहे. नदी अजूनही इशारा पातळीवरून वाहत आहे. दरम्यान, राधानगरी धरणानंतर जिल्ह्यातील आणखी एक प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी प्रकल्प 100 टक्के भरला आहे. आज शनिवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास प्रकल्प ओसंडून वाहू लागला. या प्रकल्पाची साठवण क्षमता 2.51 टीएमसी इतका आहे.
दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर शहरातील पूरस्थिती नियंत्रणात असल्याने स्थलांतरित नागरिक घरी परत जातील, असे सांगितले होते. मात्र, पूर परिस्थिती जैसे थे असल्याने कोल्हापूर शहरातील सुतारवाडा व गायकवाड वाड्याजवळील अनेक घरांमध्ये अजूनही पाणी आहे. त्यामुळे स्थलांतरित नागरिक अजूनही निवारा केंद्रात आहेत. त्यांना पूर कमी होईपर्यंत निवारा केंद्रात वा नातेवाइकांकडेच थांबावे अजून काही दिवस थांबावे लागणार आहे. शहरातील स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या 161 आहे.
कळंबा तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ
दुसरीकडे, कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कळंबा तलावाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. तलावातील पाणी पातळी 26 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. तलाव तुडुंब भरत असल्याने निम्म्या शहरासह कळंबा,पाचगावचा पाणी प्रश्न सुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महापालिका व कळंबा ग्रामपंचायतीने तलावातून सहा एमएलडी पाणी उपसा सुरू केला आहे.
राधानगरी धरणातून केवळ पॉवर हाऊसमधून 1400 क्यूसेक्स विसर्ग सुरु
दरम्यान, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. राधानगरी धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बंद झाला. यानंतर काल रात्री आठ वाजता चार आणि सात नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये 5 आणि 6 नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीपात्रातील विसर्ग बंद झाला आहे. सध्या केवळ पॉवर हाऊसमधून 1400 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :