Kolhapur Crime : असा 'वर्दीतील गांजाधारी पोलिस' होणे नाही! कळंबा जेलमधील नशेबाजांना घरात साठा करून गांजा पुरवणारा निघाला चक्क पोलिस
गेंडच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची गेल्या दहा महिन्यांपासून कळंबा जेलमध्ये सुभेदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
Kolhapur Crime: कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये (Kalamba Jail) खाकीला काळीमा फासून रक्षक भक्षक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कळंबा जेलच्या सुरक्षेसाठी नेमलेला कारागृह पोलिस (Kolhapur Police) गांजाधारी निघाला आहे. कळंबा जेलमध्ये गांजा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब गेंड या गांजाधारी पोलिसाच्या जुना राजवाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जेलमध्येच खून, हाणामारी, पोलिसाकडून अत्याचार, गांजा आत फेकण्याचा प्रयत्न, गांजा नेण्याचा प्रयत्न, झाडाझडतीमध्ये गांजा सापडणे आदी घटनांमुळे कळंबा जेलची लक्तरे यापूर्वीच वेशीवर टांगली गेली आहेत. आता पोलिसाचीच भर पडल्याने कळंबा जेलचीच सुरक्षा आता रामभरोसे झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेंडच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची गेल्या दहा महिन्यांपासून कळंबा जेलमध्ये सुभेदार पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जो काही जेलमध्ये गांजा एके गांजा हा कार्यक्रम झाला त्याचा सूत्रधार हाच आहे का? याचा उलगडा आता तपासामध्येच होणार आहे.
कळंबा जेलमध्ये गांजा नेताना बाळासाहेब गेंड सापडला. मुख्य प्रवेशद्वारातून गांजाची पुडी कारागृहात नेण्याचा बाळासाहेब गेंड प्रयत्न करत होता. थेट गांजा नेताना सापडल्यानंतर गांजाधारी बाळासाहेब गेंडच्या घरी जाऊन आणखी झाडाझडती केल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून कळंबा मध्यवर्ती जेलमध्ये वारंवार गांजा सापडल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गेंडकडून कोणकोणत्या गांजेबाजाला गांजा देण्यात येत होता, याचाही पोलिसांनी शोध सुरु केला आहे. मात्र, कारागृहातील पोलिसच कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा प्रकाराने खळबळ उडाली आहे.
कळंबा जेल अधिकाऱ्याला बेड्या
दरम्यान, याच कळंबा जेलमध्ये जानेवारी महिन्यात महिला शिपायाला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा जेलच्या अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. योगेश भास्कर पाटील असे बेड्या ठोकलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. योगेशने पीडित महिला कर्मचाऱ्यास लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जातिवाचक शिवीगाळ केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली होती. पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून 2021 पासून लैंगिक अत्याचार केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या