Kolhapur News : आई-वडिलांना सांभाळा, अन्यथा वारसा नोंद रद्द होईल; कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीचा ठराव, प्रतिज्ञापत्रही लिहून घेणार
कोल्हापूर : आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
कोल्हापूर : आई-वडिलांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, अन्यथा वारसा नोंद रद्द करण्यात येईल, अशा पद्धतीचा निर्णय कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने (Mangaon Gram Panchayat) घेतला आहे. शिवाय नवीन वारसा नोंद करताना देखील आई-वडिलांची काळजी घेईन, तसे न केल्यास कारवाईस पात्र राहिन, असे प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेतले जाणार आहे. इतकेच नाही तर वीज, पाणी या मूलभूत सुविधा देखील न पुरवण्याचा निर्णय माणगावच्या ग्रामपंचायतीने घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणगावला खूप मोठा इतिहास आहे. याच गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव परिषद घेतली होती. त्यामुळे गावाला सामाजिक सुधारणांची परंपरा आहे. या निर्णयामुळे चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या मुलांना चाप बसेल, उतार वयामध्ये कुणीही आपल्या आई-वडिलांना दूर करणार नाही, यासाठी या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं ग्रामपंचायतीचं संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे.
हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीची 14 ऑगस्ट रोजी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची वारस नोंद न करण्याबाबत ठराव करण्यात आला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
काय आहे ठराव?
कौटुंबिक जीवनात आई-वडिलांना न सांभाळता त्याचीच वारस मुले मुली आपल्या स्वत:च्या जीवनात व्यस्त असतात. विशेष म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा उपभोग घेत असतात पण आई-वडिलांना मात्र घरातून बाहेर काढून किंवा विभक्त ठेवून म्हातारपणी त्यांच्या पालणपोषणाकडे पूर्णत: दुर्लक्ष करुन आजारपणातही आर्थिक जबाबदारी न घेता त्यांच्याची आपले जणून काही नातेच नाही अशाप्रकारे त्यांचे वारस आज सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपभोगतात, परिणामी म्हातारपण हा शाप ठरला असून म्हातारपणातील वयात आईवडिलांना जगणे मात्र मुश्कील झाले आहे. त्यामुळे जो मुलगा अगर मुले आपल्या आई वडिलांनी सांभाळत नाहीत त्या मुलांना आई बापांच्या नावावरील संपत्तीचे वारस होता येणार नाही, जे मुले आणि मुली आई वडिलांना सांभाळतील त्यांनाच बापाच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे वारस म्हणून हक्क मिळावे, असे वारस नोंदीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. मी माझ्या आई-वडिलांचा सांभाळ करेन, मी त्यांना दवाखाना किंवा आरोग्याच्या बाबतीत इतरत्र कोणतीही कमतरता भासू देणार नाही, मी माझ्या कर्तव्याचे पालन करेन, माझ्याकडून या सर्व गोष्टीचे पालन झाले नाही अशी तक्रार आली किंवा शेजारच्यांकडून माहिती घेतल्यानंतर माझ्या कर्तव्यात कसूर झाल्याचं आढळल्यास ग्रामपंचायत दप्तरी असिसमेंटला लागलेले नाव तात्काळ कमी करण्यात यावं. माझ्या घरी असलेले नळ कनेक्शन कट करण्यात यावे. त्याबाबत मी कोणीही कोणतीही तक्रर करणार नाही असा मसुदा प्रतिज्ञापत्रात असेल.
हेही वाचा