Kolhapur News : सुट्टी पडल्याने मामाच्या गावाला जाताना शाळकरी मुलीवर काळाचा घाला, ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू
ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात श्रेया हेमंतकुमार हळीज्वाळे (वय 15) ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच गतप्राण झाली. ही भीषण दुर्घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळ सेल टॅक्स नाक्यासमोर झाली.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) किल्ले पन्हाळगडावर चिमुकल्याचा गाडीखाली सापडून अंत झाल्याची घटना ताजी असताना आता कागल तालुक्यातील कसबा सांगावमधील अवघ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा अपघातात जागीच अंत झाल्याची घटना घडली. ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात श्रेया हेमंतकुमार हळीज्वाळे (वय 15) ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच गतप्राण झाली. ही भीषण दुर्घटना पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीजवळ सेल टॅक्स नाक्यासमोर झाली. ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. श्रेयाच्या अपघाती मृत्यूने कुटुबीयांनी एकच आक्रोश केला. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा असा परिवार आहे. ती एकुलती एक असल्याने कुटुबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तिने आठवीची परीक्षा दिली होती.
मृत श्रेया शाळेला उन्हाळी सुट्टी पडल्याने आजोळी मामाच्या दुचाकीवरून (केए-22-एचएस-8894) कसबा सांगावहून जात होती. त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने (टीएन-52-क्यू-4686) कोगनोळी टोलनाक्याजवळ धडक दिल्याने श्रेया दुचाकीवरून कोसळून थेट ट्रकच्या चाकाखाली आली. यावेळी चाक टोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मामा शशीधर बाजूला पडल्याने ते किरकोळ जखमी झाले.
आईचा हात सोडून आजोबांकडे धावला अन् घात झाला
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच जोतिबाचे दर्शन करून किल्ले पन्हाळगडावर सहपरिवार गेले असता अवघ्या अडीच वर्षीय चिमुकल्याचा कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर गाडीखाली सापडून भीषण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आईचा हात सोडून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या आजोबांकडे धावत असताना चिमुरडा गाडीखाली सापडला. इंद्रनील अरुण दबडे (वय 2 वर्ष) असे त्याचे नाव आहे. भुदरगड तालुक्यातील खानापूर येथील दबडे कुटूंबीय पन्हाळगड पर्यटनासाठी गेले होते. यावेळी आईचा हात सोडून रस्ता ओलांडताना गाडीखाली इंद्रनील सापडल्याने जागीच ठार झाला. ही घटना पन्हाळा येथील तबक उद्यानासमोर घडली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
