Pune Crime Ayush Komkar: आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार, आज अंत्यसंस्कार, वडिलांना जेलमधून पॅरोलवर सोडलं
Pune Crime Ayush Komkar: आयुष कोमकरच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली होती. गोविंद त्याच्या नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना हा हल्ला झाला होता.

Pune Crime Ayush Komkar: गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात गँगवॉरच्या घटनेने खळबळ उडवून दिली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने (Vanraj Andekar murder case) 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे आयुष कोमकर याची हत्या केली होती. आयुष कोमकर हा वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा म्हणजे त्याचा भाचा होता. पोलिसांना आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार, याचा अंदाज होता. पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न उधळून लावला होता. मात्र,अखेर 5 सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरची (Ayush Komkar) हत्या केली. यानंतर पुण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार करुन दिले नव्हते.
आयुष कोमकरची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते. त्यामुळे संपूर्ण पोलीस दल गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते. अशा परिस्थितीत आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा उपलब्ध करुन देणे शक्य नव्हते. याशिवाय, आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय हे तुरुंगात आहेत. आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याकडून पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. हे सर्वजण नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना पुण्यात येण्यासाठी वेळ लागणार होता. या कारणांमुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर लगेच अंत्यसंस्कार करणे टाळले होते. पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता. हा मृतदेह आज बाहेर काढला जाणार असून संध्याकाळपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यसंस्कारासाठी आयुष कोमकरचे वडील आणि वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आज ते आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करतील. तर कारी संजीवनी कोमकर आणि काका जयंत कोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत. गेल्यावर्षी एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती, तो बंडू आंदेकरांचा मुलगा होता. आयुष कोमकर हा 18 वर्षांचा असून महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 5 सप्टेंबरला आयुष कोमकर क्लासमधून येत असताना घराच्या बेसमेंटजवळ दोघांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने आज आयुष कोमकर याच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
आयुष कोमकर हत्या प्रकरणात महिलेचं कनेक्शन समोर; आंदेकर प्रकरणात मोठी अपडेट, गुन्हा दाखल
























