Bhagat Singh Koshyari : चले जाव, जेलभरो अन् सर्वपक्षीय बंदची हाक! राज्यपाल हटाव मोहिमेतील शेवटचा निर्णायक ठोका कोल्हापुरातून!
महाराष्ट्रात आल्यापासूनच महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केलेल्या अत्यंत वादग्रस्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(Bhagat Singh koshyari) यांची अखेर महाराष्ट्रातून उचलबांगडी झाली आहे.
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात आल्यापासूनच महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केलेल्या अत्यंत वादग्रस्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(Bhagat Singh koshyari) यांची अखेर महाराष्ट्रातून उचलबांगडी झाली आहे. आज महाराष्ट्राच्या राज्यपालांसह नऊ राज्यातील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पदमुक्त करण्याची मागणी केलेल्या भगत सिंह कोश्यारी यांना यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेल्या एका वादग्रस्त अध्यायाची अखेर झाली आहे.
महापुरुषांवर बेताल वक्तव्यांची मालिकाच केलेल्या राज्यपालांविरुद्ध संतप्त भावना राज्यात व्यक्त झाल्या होत्या. महापुरुषांवर त्यांनी सातत्याने वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करून महाराष्ट्रातील राजकीय वादात तेल ओतले होते. पहाटेच्या शपथविधीचेही साक्षीदार ते राहिले. त्यामुळे राज्यपालांच्या घटनात्मक अधिकारांचीच त्यांनी पायमल्ली केल्याचा सातत्याने आरोप त्यांच्यावर होत राहिला.
राज्यपाल हटाव मोहिमेचा शेवट कोल्हापुरातून
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून राज्यपालांविरोधात प्रचंड विरोध सुरु होता. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेत राज्यपाल चले जावचा नारा दिला होता. कोणत्याही परिस्थितीत राज्यपालांना कोल्हापूरमध्ये येऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी युवासेनेकडून त्या संदर्भात कुलगुरू डॉक्टर डी. एन. शिर्के यांना निवेदन देण्यात आलं होतं.
त्यानंतर शनिवारी या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जेलभरो आंदोलन शिवसेनेकडून करण्यात आले. तसेच सर्वपक्षीय कृती समितीनेही बैठक घेताना गुरुवारी (16 फेब्रुवारी) कोल्हापूर बंदची हक्क दिली होती. त्यामुळे राज्यपालांविरोधातील संघर्ष वाढत चालला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांच्या बदलीची बातमी आल्याने कोल्हापूरमध्ये शिवसेनेकडून आनंद व्यक्त करण्यात आला. आज बऱ्याच दिवसांनी शुभवार्ता कानावर पडल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली.
कोश्यारींसारखे राज्यपाल बघायला मिळू नयेत
संजय पवार म्हणाले की, कोश्यारींसारखे राज्यपाल बघायला मिळू नयेत हीच आंबा बाईकडे प्रार्थना आहे. राजीनामा घेण्यास उशिर केल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अनेकवेळा आमचं दैवत असणारे शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला. राजकीय पक्षाची भूमिका घेऊन वागत होते, असेही पवार म्हणाले. दुसरीकडे, संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह महाविकास आघाडी, राज्यातील सर्वच सामाजिक, राजकीय संघटनांकडून राज्यपालांविरोधात गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी झाल्याने एक प्रकारे राज्यपाल वादावर पडदा पडला आहे. मात्र, राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळून माफीवर एकही शब्द काढला नाही हे दुर्दैव आहे.
इतर महत्वाच्या बातम्या