(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 6 मार्च रोजी सुनावणी
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Hasan Mushrif : सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी 6 मार्चला सुनावणी होणार आहे. हसन मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. दरम्यान, अर्जावर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे ईडीच्या वकिलांकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या मुलांकडून राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलं नसल्याचे म्हटले आहे. चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्यास चौकशीवर परिणाम होईल, असा दावा ईडीने केला आहे.
हसन मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
दुसरीकडे, हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुश्रीफांविरोधात फिर्याद देणाऱ्यासह 16 जणांविरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुरगूड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. सभासदांची कोणतीही संमती न घेता आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात फिर्याद दिल्याप्रकरणी विवेक विनायक कुलकर्णीसह 16 जणांवर मुरगूड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ यांनी 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार
दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असे म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी मुश्रीफ यांच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्रीफ यांनी 2012 मध्ये कारखाना उभारणीसाठी सभासद, भागधारक होण्याचे आवाहन केले होते. त्यातून लोकांकडून 10 हजार रुपयांप्रमाणे शेअर भांडवल घेतले आणि सुमारे 40 कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या